Tue, Mar 19, 2019 03:17होमपेज › Satara › रस्त्यावरील मृत कुत्र्याने घेतला महिलेचा बळी

रस्त्यावरील मृत कुत्र्याने घेतला महिलेचा बळी

Published On: May 22 2018 1:29AM | Last Updated: May 21 2018 11:38PMसातारा : प्रतिनिधी

दाम्पत्याच्या दुचाकीला रविवारी रात्री लिंब खिंड येथे रस्त्यावर पडलेल्या मृत कुत्र्यामुळे झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून पती जखमी झाला आहे. बारशाचा कार्यक्रम उरकून घरी परत येत असताना ही दुर्घटना घडली. 

सौ. उज्ज्वला भरत पवार (वय 53, मूळ रा. महिगाव, ता. जावली, सध्या रा. जरंडेश्‍वर नाका, सातारा) या जागीच ठार झाल्या. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पवार दाम्पत्य रविवारी नातलगाचा बारशाचा कार्यक्रम असल्याने दुचाकीवरून महिगाव येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते साताराकडे येत होेेते. लिंबखिंड येथे विठ्ठल-मंगलम मंगल कार्यालय परिसरात आल्यानंतर रस्त्यामध्ये एक मृत कुत्रे पडलेले होते. त्यावरून दुचाकी गेल्यानंतर पाठीमागे बसलेल्या सौ. उज्ज्वला पवार या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती कुटुंबीय, नातलगांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. मृत उज्ज्वला या सातारा येथील गुजराती अर्बन को-ऑप. बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.