Tue, Jul 23, 2019 04:04



होमपेज › Satara › वाहनांच्या धुरामुळे श्‍वसनविकार वाढले

वाहनांच्या धुरामुळे श्‍वसनविकार वाढले

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 7:39PM



सातारा : प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे वातावरणात  प्रदूषण वाढत आहे. वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून वाढत्या धुरामुळे श्‍वसनविकारांमध्ये वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यातच गेली महिना ते दीड महिना ढगाळ वातावरणात पावसाच्या सरी कोसळत असल्याने आजारातही वाढ झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सातारा जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा वगळता इतर सर्व तालुके आर्थिकदृष्ट्या सधन व समृध्द म्हणून ओळखले जातात. कृषी, औद्योगिक, शैक्षणिक संस्थांचे जाळे जिल्हाभर पसरले आहे. बँका व पतसंस्थांचे मोठे नेटवर्क जिल्ह्यात कार्यरत असल्याने मोठी आर्थिक उलाढालही होते.   येथील नागरिकांचे दरडोई उत्पन्नही समाधानकारक आहे. त्यामुळे भौतिक सुखाची सर्व साधनसामुग्री बाळगण्याची नागरिकांची ऐपत असल्याने दुचाकी व चारचाकी  वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. दुचाकी व चारचाकी वाहन बाळगणे ही नागरिकांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जात असल्यानेही वाहनांची संख्या वाढत आहे.  दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, अक्षयतृतिया असे शुभमुहूर्त साधून शहरात वाहन खरेदीतून लाखोंची उलाढाल होत असते.  

सातारा जिल्ह्यात सध्य स्थितीत दुचाकी वाहनांची संख्या 5 लाख 46 हजार   751 एवढी असून चारचाकी व इतर वाहनांची संख्या 7 लाख 4 हजार 968 एवढी आहे.  जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येचा तुलनात्मक विचार करता शहरात दररोज किमान लाखो लिटर पेट्रोल व डिझेलचा धूर निघत आहे. त्यामुळे या धुरामुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या पाच वर्षात वाहनांच्या माध्यमातून कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे मत वैज्ञानिकांनीही व्यक्त केले आहे.   जिल्ह्याच्या क्षेत्रफळाचा विचार करता दररोज जिल्ह्यात अनेक प्रकारची हजारो वाहने  सुसाट धावत असतात. राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जात असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील वाहनांचे प्रमाणही खूप आहे.  केवळ एसटीच्या परजिल्ह्यातील 1800  फेर्‍या दिवसाला होत असतात. या फेर्‍या जिल्ह्यात श्‍वसनविकारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यातच गेली महिना ते दीड महिना ढगाळ  वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने किरकोळ आजारांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

एक दिवस नो व्हेईकल डे हवाच...

सायकलचा  वापर केल्यास प्रदूषणाबरोबरच व्यायामही होईल. इंधनाची बचत होईल तसेच  सायकलीमुळे हवा, ध्वनी प्रदूषणही टाळले जाऊ शकते.  आरोग्याचा विचार करता प्रत्येकाने एक दिवस नो व्हेईकल दिवस साजरा केला पाहिजे. परदेशात विकसित राष्ट्रांतही अलिकडे सायकलींचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. शासकीय कार्यालये तसेच अन्य जवळपासच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलींचा सर्रास वापर होत असतो. वर्षातून ठरवून एखादा महिना अथवा महिन्यातून काही दिवस सायकलीचा वापर केला तर आपल्या येथेही ध्वनीप्रदूषणाचा त्रास काही प्रमाणात कमी होईल. त्याचा आरोग्यालाही मोठा फायदा होणार आहे.