Fri, Apr 26, 2019 15:57होमपेज › Satara › आगामी विधानसभा लढणार नाही : विलासराव उंडाळकर

आगामी विधानसभा लढणार नाही : विलासराव उंडाळकर

Published On: Apr 27 2018 1:09AM | Last Updated: Apr 26 2018 10:17PMढेबेवाडी : प्रतिनिधी 

गेल्या 50 वर्षात या मतदार संघातील जनतेने रयत संघटनेच्या माध्यमातून माझ्यावर विश्‍वास टाकून प्रचंड ताकद दिली, आजही देत आहेत. पण आज मी मत मागण्यासाठी आलेलो नाही. आगामी विधानसभा निवडणूक मी लढणारच नाही. पण कराड दक्षिणचा भावी आमदार रयत संघटनेचाच असेल, असा विश्‍वास माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांनी व्यक्त केला. 

कराड बाजार समितीच्या उपसभापतीपदी अशोकराव पाटील पोतलेकर यांची अविरोध निवड झाल्याबद्दल  युवानेते व जि.प.सदस्य अ‍ॅड.उदयसिंह पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांच्या उपस्थितीत पोतले ता.कराड येथे  त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. 

यावेळी बाजार समितीचे सभापती मोहनराव माने, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, कोयना दूध संघाचे चेअरमन मारूती यादव, उप सभापती रमेश देशमुख, जि.प.सदस्य प्रदीप पाटील, माजी सभापती प्रदीप पाटील, आप्पासाहेब गरूड, संदीप पाटील, राजू जाधव, अशोक माने, अधिकराव पाटील आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

उंडाळकर म्हणाले, रयत संघटनेबरोबर या मतदार संघातील जनता गेल्या 50 वर्षापासून ठाम आहे. या जनतेने भल्या भल्या विरोधकांना पाणी पाजले आहे.रयतच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्यांना सत्तेत बसविले आहे. मात्र सत्तेत राहून समाजासाठी, व सर्व सामान्य जनतेसाठी काही करता येत नसेल तर सत्तेत राहू नका. जनतेची नाळ कधी तोडू नका. समाजासाठी व संघटनेसाठी काम करीत रहा. संघटना सोडली तर बाहेर तुम्हाला कुणी विचारणार सुद्धा  नाही.

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सक्षम कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. तर काँग्रेसने देशाच्या विकासाचा पाया घातला. आजचा विकसित भारत ही काँग्रेसच्या धोरणाची फळे आहेत. पण आज काय स्थिती आहे ? देशात जातीयवादी शक्ती फोफावत आहेत.उन्नाव, कथुआ यासारख्या घटना काय दर्शवितात? सर्वसामान्य जनता विषेशतः महिला सुरक्षित आहेत का? त्यांना न्याय मिळतोय का विधिमंडळे, संसद, एवढेच काय  न्याय व्यवस्थेसारख्या तटस्थ आणि स्वायत्त संस्थांवर सुद्धा भाजपा सारख्या जातीयवादी पक्षाचा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. याचा विचार करण्याची  व सावधानतेने निर्णय घेण्याची वेळ आलीय. यावेळी अशोकराव पाटील यांचा अजिंक्य तरूण मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.  अशोक पाटील यांनी सत्काराला उत्तर दिले. सदाभाऊ पवार यांनी आभार मानले.