Mon, Nov 19, 2018 04:14होमपेज › Satara › गांधीगिरी; त्यांच्यासमोर चक्क पोलिसानेच जोडले हात!

त्यांच्यासमोर चक्क पोलिसानेच जोडले हात!

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 10:18AMउंब्रज : प्रतिनिधी

महाविद्यालयीन युवक, तरूणांकडून होणार्‍या वाहतूक नियमांच्या पायमल्लीचे प्रकार आपण अनेकदा पाहतो. पण एका व्यक्तीने तीन मुलींसह पत्नीला दुचाकीवर बसवून प्रवास केल्याचे सहजासहजी कोणालाही पटणार नाही. पण असा अजब प्रकार इंदोली फाट्यावर पोलिसांच्या निदर्शनास पडला आणि काय बोलावे हे न कळल्याने वाहतूक पोलिसाने चक्क चालकालाच नमस्कार घातला.  

शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास उंब्रज पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे प्रविण फडतरे हे नेहमीप्रमाणे महामार्गासह सेवा रस्त्यावर गस्त घालत होते. ते इंदोली फाटा परिसरात आल्यानंतर इंदोली गावातून एक दुचाकी आली. ही दुचाकी पाहून फडतरे यांचा क्षणभर विश्‍वासच बसला नाही. पाठीमागे पत्नी व दोन मुली, दुचाकीच्या टाकीवर एक मुलगी आणि स्वत: चालक असे तब्बल पाचजण दुचाकीवरून प्रवास करत होते.हा सर्व प्रकार पाहून फडतरेही क्षणभर स्तब्ध झाले. चालकाला दोन्ही हात जोडून नमस्कार घालत दादा, ताई काय हे ? पोलिसांचा राहिला किमान आपल्या मुलांचा, कुटुंबियांचा तरी विचार करा ? जीवन खूप अनमोल आहे, असे बेजबाबदारपणे वाहन चालवू नका असा सल्‍ला वाहतूक शाखेचे कर्मचारी फडतरे यांनी संबंधित चालकाला दिला. 

त्यानंतर चालकाने आपली चूक मान्य करत पुन्हा असे करणार नाही. तसेच यापुढे वाहतूक नियमांचे पालन करू अशी ग्वाहीही संबंधित चालकाने दिली. घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. दरम्यान, फडतरे यांनी दाखविलेली या गांधीगिरीची चर्चा आज दिवसभर उंब्रज परिसरात सुरू होती.

Tags : Satara, traffic, police, namaste,  driver