Sat, Mar 23, 2019 12:02होमपेज › Satara › कुठे गेले आट्यापाट्या, काचा-कवड्या, सूर पारंब्या ?

कुठे गेले आट्यापाट्या, काचा-कवड्या, सूर पारंब्या ?

Published On: Apr 27 2018 1:10AM | Last Updated: Apr 26 2018 8:43PMसातारा : संजीव कदम

आज व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, इंटरनेट व टीव्ही चॅनेलच्या महाजंजाळात तरूण पिढी, बालके अन् चिमुरडीही खेळाचा खराखुरा आनंद, आत्मसुख व त्यासोबत आरोग्याची काळजी घेण्यासही विसरले आहेत. लगोरी, आट्यापाट्या, कवड्या, सूर पारंब्या, विटी-दांडू असा कोणताही खेळ असो त्यातून आत्मानुभूती, प्रेम, मातीशी नाते घट्ट विणले जात होते. निसर्गाकडे नेणारे असे कितीतरी पारंपरिक  खेळ आता खल्लास झाले आहेत. आरोग्य सुंदर रहायचे तर बाहेरील  वार्‍यामध्ये खेळले पाहिजे. शरीर मातीने माखले पाहिजे. रांगड्या खेळांनी शरीर पिळून निघाले पाहिजे. अवयवयांना व्यायाम झाला पाहिजे. पण हे खरोखरच होतेय का हो? 

माणूस हा निसर्गाचा भाग आहे. माणूस वेगळा आणि निसर्ग वेगळा असे होऊच शकत नाही. माणसाच्या शरीराच्या कणाकणात निसर्गाचा मूलभूत स्त्रोत सळसळत असतो. पारंपरिक खेळ आपल्याला निसर्गाकडे नेतात. आपले निसर्गाशी नाते घट्ट करतात. या खेळातून चपळता येते, उत्साह येतो. याहूनही पुढे जाऊन बोलायचे तर स्वत:च्या शरीराची, मनाची ओळख स्वत:लाच होते. आपले अस्तित्व जाणवते. ठळक हाते. जीवनाचे सौंदर्य केवळ  बौद्धिकतेत नाही तर शरीरातील, मनातील निसर्गतत्वे ओळखण्यात आहे. ही निसर्गतत्वे जागृत होतात ती खेळांमुळे. व्हिडिओ गेम्स खेळून तासन्तास इंटरनेटला चिकटून जीवन कळत नाही. 

जीवनाचा रसरशीतपणा मैदानावर आहे. चित्तवृत्ती फुलवण्यासाठी शरीर हलले पाहिजे आणि रक्‍त सळसळले पाहिजे. शरीराचा कण न् कण रोमांचित झाला पाहिजे. घरात बसून यातील कोणतीही गोष्ट होत नाही, एकलकोंडेपणा येतो. घरातले व्हिडिओ गेम्स, मोबाईलशी, नेटशी तासन्तास संवाद हा अखेर ‘अभासी’च असतो.  यात कसला आलाय जिवंतपणा? सूर पारंब्या खेळून, खो-खो खेळून जो ताजेपणा, खेळकरपणा मनात मुरतो व चेहर्‍यावर प्रसन्‍नता झळकते ते व्हिडीओ गेम्सने येईल का? 

पारंपरिक खेळातून खिलाडूवृत्तीही जोपासली जाते. महत्त्वाचे म्हणजे खेळांमुळे समाजशीलता निर्माण होते. एकात्मभाव द‍ृढ होतो. आपले जगातील महत्त्व आणि अस्तित्व अधोरेखित होते. नेतृत्व विकसित होते ते तर वेगळेच! उत्तम अनुयायी तयार होतात. ऐक्यभावना निर्माण होते. जीवन रसमय होते. मात्र आता यातील काहीच उरलेलं दिसत नाही. सगळेच मोबाईलला चिकटून बसलेत. तासन्तास चॅटिंग सुरु आहे. त्यातून उरलेला वेळ टीव्ही पाहण्यात घालवला जात आहे. 

एकमेकांतील संवाद तर केव्हांच दुरावला आहे. खेळांचा ‘ख्योळ’ होण्यास हे सगळच जबाबदार नाही का? पालक वर्गही त्याला तितकाच जबाबदार असूनही ते आज स्वीकारण्याची मानसिकता कोणाकडेही नाही. अभ्यासाशिवाय पर्याय नाहीच पण त्याचा किती बाऊ करायचा? हे पालकांनाच कळेना. अशा पालकांनो, तुमची मुलं भलीही अभ्यासानं हुशार होतील पण त्यांच्या आयुष्यमानाच काय? त्यांच आयुष्यमान तर तुम्ही घटवत नाही ना, याचा गांभीर्याने विचार करायला नको का? हुशार, गुणवंत, अभ्यासू अन् स्मार्ट असणारी ही मुलं म्हणजेच खरी दौलत. पण ते सांगायला ही दौलतच आपल्याकडं नको का? 

चला तर मग अभ्यासाबरोबर मुलांना मनसोक्‍त खेळू द्या, सुट्टीची मजा लुटू द्या.  खेळाने त्यांचं शरीर अन् मनही विकसित होऊ शकतं.

उन्हातान्हात मजा...

पूर्वी सुट्ट्या लागल्या रे लागल्या की बालगोपाळांना गावाकडचे वेध लागायचे. गावी मग मित्र, मैत्रिणी, नात्यातील सहकारी यांची गट्टी जुळली की त्यांच्या खेळण्याला जणू काही आकारच राहत नव्हता. अगदी देहभान हरपून बालचमू सुट्टीचा आनंद घेत असायचे. त्यांचे जेवण्याकडेही लक्ष नव्हतेे. दिवसभर उन्हातान्हात खेळण्यातच त्यांचा आनंद सामावलेला असायचा. 

भांडीकुंडीचा संसार

पूर्वीचे खेळ आता हरवून गेले असून अनेक खेळतर केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. चिमुरड्यांच्या ‘भांडीकुंडी’ खेळाचा बाज मात्र आजही टिकून आहे. ही चिमुरडी मंडळी मिळेल त्या जागेत, कधी कोनाड्यात तर कधी छपरात, कधी काट्याकुट्यात तर कधी अगदी घरातील एखाद्या मोडक्या टेबलखालीही भांडीकुंडीचा संसार थाटत असतात. कोण भरउन्हात पोहायला जातो तर कोण सावलीत पत्याचा डाव मांडत असतो. अनेकजण कॅरमसारखे बैठे खेळही खेळत उन्हाची तिरीप घालवतात. उन्ह खाली झाले की क्रिकेटच्या मैदानावर बालगोपाळांची जणूकाही जत्राच भरत असते.