Tue, Apr 23, 2019 21:34होमपेज › Satara › भाजप सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ देण्याची वेळ 

भाजप सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ देण्याची वेळ 

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 11:33PMसातारा : प्रतिनिधी

राज्यातील भाजप सरकारने घोषीत केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतून शेतकर्‍यांना अपेक्षित लाभ मिळाला नाही, हे वास्तव आहे. शेतकर्‍यांनी  स्वखर्चाने व कर्ज काढून हातपंप व विहीर काढल्या, पाईपलाईनी केल्या. पण वीज पुरवठ्यासाठी असणारी सवलत रद्द करण्याचा निर्णय भाजप सरकारने  घेतला.  राज्यातील भाजप सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ दिला पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर हल्‍लाबोल चढवला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पत्रकारांशी बोलतान आ. शिंदे म्हणाले, खा. शरद पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री असताना देशभरातील  शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला. मात्र आत्ताच्या सरकारला शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करता आली नाही.   सरकारच्या वारंवार बदलणार्‍या जाचक अटींमुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. कर्जमाफीचा फायदा सातारा जिल्ह्याला झालाच नाही. कर्जमाफीतून ऊस पीक वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे सुमारे 100 कोटींचे नुकसान झाले. त्याचबरोबर पाईपलाईन, ड्रीप, ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले.  शेतकर्‍यांचे 70 कोटीचे नुकसान झाले आहे. सरकारच्या धोरणांमुळे आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवली आहे. विदर्भाबरोबर आत्महत्येचे लोण पश्‍चिम महाराष्ट्रातही येवून पोहचले आहे. दरम्यान,  ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी आपल्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत सर्व समाज घटकांना समान संधी देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. याचा मनस्वी आनंद महाराष्ट्राला आहे. परंतु आत्ताचे भाजप सरकार भांडवलदार धार्जिण आहे. भाजपला निवडणुकीत पैशाची मदत करणार्‍या उद्योजकांनाच अच्छे दिन आलेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’ म्हणजे दु:खाचा डोंगर वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात पुन्हा सत्तेवर येईल असा विश्‍वासही आ. शिंदे यांनी व्यक्‍त केला.

Tags : Satara, time, give, shock, BJP, governments, head