Tue, Sep 25, 2018 13:32होमपेज › Satara › भारतीय राज्यघटनेला उग्र धर्मवादाचा धोका ; किशोर बेडकिहाळ 

भारतीय राज्यघटनेला उग्र धर्मवादाचा धोका ; किशोर बेडकिहाळ 

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 8:50PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

भारतीय राज्य घटनेने दिलेल्या धर्म स्वातंत्र्य व धर्मनिरपेक्षतेला  फॅसिस्ट उग्र धर्म जातीयवाद्यांचा धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.

संबोधी प्रतिष्ठानने  आयोजित केलेल्या ‘भारतीय संविधान: धर्म व अभिव्यक्ती स्वातंत्र्य’  या विषयावर किशोर बेडकिहाळ बोलत होते. विचार मंचावर प्रा. प्रशांत साळवे होते.

बेडकिहाळ म्हणाले, भारतीय संविधानाने धर्म स्वातंत्र्याला चौकट घातली आहे. या मर्यादेचे पालन होणे आवश्यक आहे. धर्म मानण्याचे न मानण्याचे, आस्तिक, नास्तिक असण्याचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. धर्म ही वैयक्तिक आचरणाची बाब आहे. त्यामुळे तो घरात कुटुंबातच पाळला पाहिजे. मात्र, सध्या धर्म घरातून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत.

देवस्थान संस्थांना संपत्ती निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आला असल्याने त्यांच्याकडे अमाप संपत्ती गोळा होत आहे. या संपत्तीचा राष्ट्राला उपयोग व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे नागरिक व समाजाच्या उन्नयनासाठी महत्त्वाचे आहे. हे स्वातंत्र्य उपभोगण्याची क्षमता व पात्रता नागरिकांची वाढली पाहिजे.  बंदिस्त धर्म जातीमुळे समाज म्हणून आपण  मोठ्या अध:पतनाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. नागरिकत्व विकसित  करण्याऐवजी लाभार्थी ग्राहक बनवण्याचेच काम देशात सुरु आहे. अनिल बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते.