Wed, May 22, 2019 15:07होमपेज › Satara › पोक्सोप्रकरणी युवकाला अटक

पोक्सोप्रकरणी युवकाला अटक

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:22PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन अल्टो कारमधून जबरदस्तीने नेऊन मोरघर (ता. जावली) येथील घाटात अत्याचार केल्याप्रकरणी गणेश शिवाजी चव्हाण (वय 22, रा. खिंडवाडी, ता. सातारा) याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कार जप्‍त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहराजवळील एका गावात सतरा वर्षीय युवती कुटुंबीयांसोबत राहत असून, ती एका महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. त्या युवतीचा खिंडवाडी येथे राहणारा गणेश चव्हाण हा वारंवार पाठलाग करत होता. दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी ती युवती चालत महाविद्यालयात निघाली असताना चव्हाण हा अल्टो कारमधून आला व त्याने मुलीला रस्त्यावर अडवून  जबरदस्तीने कारमध्ये बसवले. कारमध्ये बसवल्यानंतर तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देवून संशयिताने कार आनेवाडी मार्गे मोरघर घाटात नेली.

ऑगस्ट महिन्यामध्ये संशयिताने मुलीवर अत्याचार केल्यानंतर कारमध्ये बसवून तिला पुन्हा सातार्‍यात आणले. यावेळी संशयिताने वाटेत असताना पुन्हा मुलीवर अत्याचार केले. सातार्‍यात सोडल्यानंतर संशयित  त्या मुलीला पुन्हा वारंवार त्रास देवू लागला. दि.1 ते 6 डिसेंबर या कालावधीत संशयिताने त्या युवतीचा वारंवार पाठलाग करत तिला त्रास देत धमकावले. वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून अखेर त्या मुलीने सातारा शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार दिली. संशयित गणेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन त्याची कार जप्‍त केली. या घटनेचा पुढील तपास फौजदार वंजारी करत आहेत.