Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Satara › सुधन्वाची सातारा चेन ओपन होणार?

सुधन्वाची सातारा चेन ओपन होणार?

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 10:45PMसातारा : प्रतिनिधी

नालासोपारा येथील जिलेटिनसारखे विस्फोटक व देशी बॉम्ब प्रकरणात सातार्‍यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा एकवेळचा कार्यकर्ता सुधन्वा गोंधळेकर याचे नाव समोर आल्यानंतर सातार्‍यात खळबळ उडाली. या प्रकरणाने एटीएसच्या ‘रडार’वर पुन्हा एकदा सातारा आला असून, आता हे कनेक्शन आणखी कोणापर्यंत पोहोचणार? गोंधळेकर याची सातार्‍यात चेन आहे का? असेल तर ती ओपन होणार का? यामध्ये सातार्‍यातील आणखी काही कार्यकर्त्यांचा रोल आहे का? या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान, सुधन्वाच्या नावामुळे आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडेही पोलिसांची संशयाची सुई गेली आहे.

सुधन्वा गोंधळेकर हा मूळचा सातार्‍याचा असून करंजे येथील झेंडा चौकात त्याचे घर आहे. संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेचा कार्यकर्ता आहे. संघटनेमध्ये त्याला कोणतेही पद नव्हते. तो फक्‍त प्रचारक म्हणून काम करत होता. मात्र, नालासोपाराच्या घटनेमध्ये त्याचे नाव समोर आल्याने   शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांमधील चलबिचल वाढली आहे. सुधन्वाचे करंजेबरोबरच सातार्‍यातील अन्यत्र कोठे कोठे सर्कल आहे?, तो पुण्यातून  सातार्‍यातील कोणाच्या संपर्कात असायचा? याबाबीही एटीएसच्या रडारवर आल्या असून हे सातारा कनेक्शन आता तपासामध्ये कोणत्या टप्प्यावर पोहोचणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

सुधन्वा हा जरी शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता असला तरी त्याचे कुटूंबिय हे सनातन संस्थेशी सलग्‍न होते. त्यामुळेच दि. 17 ऑक्टोबर 2017 मध्ये सनातन प्रभातच्या अंकामध्ये सुधन्वा याची मुलगी सई गोंधळेकर (वय 8) हिच्याबद्दल लेख प्रसिद्ध झाला होता. दि. 4 डिसेंबर 2017 ला पुन्हा एकदा सईवर लेख लिहिण्यात आला होता. यामध्येही ती एक दैवी रूप असून तिची 61 टक्के अध्यात्मिक पातळी असल्याचे मांडण्यात आले होते. त्यामुळे सुधन्वा कुटुंबिय सनातनशीही जोडले गेल्याचा कयास असून पोलिस त्यादृष्टीने तपासाची चक्रे गतीमान करण्याची शक्यता आहे.

दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला होता. त्यानंतर एटीएस, एसआयटी, सीबीआय व पोलिसांनी अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांच्याकडे चौकशी केली होती. त्याच दरम्यान सुधन्वा हा शिवप्रतिष्ठानचा सक्रीय कार्यकर्ता असताना पोलिसांच्या नजरेतून कसा काय सुटला? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
सुधन्वा गोंधळेकर याला अटक केल्यानंतर त्याचे वडील सुधीर गोंधळेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सुधन्वा हा दोन वर्षांपासून पुण्यात ग्राफीक डिझायनरचा व्यवसाय करतो. सुधन्वा शिवप्रतिष्ठानमध्ये काम करत होता. मात्र, तो असे काही करेल असे वाटत नाही. आमच्या कुटूंबाला सनातन संस्थेचे विचार पटल्याने या संस्थेशी संलग्‍न असून नाम जप करत असल्याचे त्यांनी सांगितले.

करंजेत उलटसुलट चर्चांना उधाण

ग्राफीक डिझाईनचा व्यवसाय करणार्‍या सुधन्वा गोंधळेकर याचे शालेय शिक्षण अनंत इंग्लिश स्कूल, तर उच्च शिक्षण हे गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये झाले आहे. त्याचा भाऊ आय.टी. क्षेत्रात शिक्षण घेतो. हे कुटुंब उच्चशिक्षित आहे. त्यामुळे अशा विघातक कृत्यामध्ये सुधन्वाचे नाव आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. तर गोंधळेकर कुटुंबीयांना मानसिक धक्‍का बसला आहे. या घटनेनंतर करंजे परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. खरंच सुधन्वा असे कृत्य करू शकतो का? असा प्रश्‍न नागरिक एकमेकांना विचारत आहेत. सुधन्वाला अटक केल्यानंतर आता पुढे काय होणार? याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.