Tue, Mar 19, 2019 15:30होमपेज › Satara › विद्यार्थिनींनी चार तास रोखल्या १५ एसटी

विद्यार्थिनींनी चार तास रोखल्या १५ एसटी

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 8:22PMकराड : प्रतिनिधी 

गेल्या दोन महिन्यांपासून पाससाठी विद्यार्थ्यांची होणारी परवड, पाटण ते कराड विद्यार्थ्यांना न घेता सुसाट, मनमानीपणे धावणार्‍या बसेस, आगार व्यवस्थापकांचे विद्यार्थिनींना अपशब्द वापरून केलेले उध्दट वर्तन यामुळे संतापलेल्या विद्यार्थीनींनी पाटण ते कराड रस्त्यावरील वसंतगड (ता. कराड) येथे तीन चार तास  सुमारे 15 एसटी रोखून आंदोलन केले. अधिकारी आल्याशिवाय व आम्हाला एसटीची सुविधा वेळेत मिळाल्याशिवाय एकही बस सोडणार नाही, असा पवित्रा विद्यार्थीनींनी घेतला. यावेळी पोलिस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्यस्थी करत याबाबत कराड आगार व्यवस्थापकांकडे चर्चा करू असे सांगितल्यावर विद्यार्थीनींनी बसेस  जाण्यास मार्ग मोकळा केला. यावेळी पोलिसही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. तर कराडमध्येही बसस्थानकात तणावपूर्ण परिस्थिती झाल्याने पोलिसांनी धाव घेतली. 

कराड आगाराच्या पासधारक विद्यार्थ्यांची शाळा, कॉलेज सुरू झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड परवड होत आहे. दोन दोन दिवस पाससाठी रांगेत उभे राहूनही विद्यार्थ्याना पास मिळत नव्हते. केवळ दोन कर्मचार्‍यांद्वारे पास देत असल्याने तासनतास विद्यार्थी रांगेत उभे रहात होते. याचबरोबर पाटण ते कराड या मार्गावरील बसेस  सुपने, म्होप्रे, वसंतगड, विहे आदी ठिकाणी न थांबता सुसाट धावत आहेत. वाहक व चालक मनमानीपणाचा कारभार करत आहेत. विदयार्थ्यांना बसमध्ये प्रवेश न देता बसेस धावत असल्याने विद्यार्थ्यांकडे पास असूनही खासगी वाहनाने कॉलेजला ये— जा करावी लागते. याचबरोबर बसेसच्या वेळाही कॉलेजच्या वेळेनुसार नसल्याने विद्यार्थ्यानी याबाबत आगार व्यवस्थापक जे. डी. पाटील यांना भेटून माहिती दिली होती. मात्र त्यावेळी पाटील यांनी विद्यार्थीनींना अपशब्द वापरून उध्दट वर्तन केल्याने गुरूवारी सकाळी 6.30 वाजता वसंतगड येथे रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून सर्व बसेस विद्यार्थीनींनी रोखून धरल्या. सुमारे तीन तास बसेस पुढे जाऊ दिल्या नाहीत. यावेळी पोलिसांनी विद्यार्थीनींची समजूत काढत व्यवस्थापकांशी चर्चा करा असे सांगितले मात्र यावेळी विद्यार्थी आक्रमक झाले होते.

याबाबतची माहिती कळल्यावर ‘मनसे’चे मलकापूर शहराध्यक्ष दादा शिंगण, कराड शहराध्यक्ष सागर बर्गे, राहूल संकपाळ, संभाजी मुळे तसेच कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढत व्यवस्थापकांशी याबाबत चर्चा करू असे सांगितले. यावर सर्व विद्यार्थी व मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावांचे सरपंच यांनी कराड येथे  व्यवस्थापक जे. डी.पाटील यांना घेराव घालत जाब विचारला. विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाल्याने याठिकाणी तालुका पोलिस ठाण्याचे अशोक क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक भारत चंदनशिवे, हे.कॉ. सपाटे तसेच महिला पोलिस दाखल झाले. त्यामुळे आगार व्यवस्थापकांना नमते घेत विद्यार्थ्याच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच 

सोमवारपासून पास देण्यासाठी आणखी दोन कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात येईल, शाळा, कॉलेजच्या वेळेत एसटीच्या  ये—जा करण्याचे नियोजन केले जाईल, असे आश्‍वासन दिले. यावर विद्यार्थ्यांनी सोमवारपासून   एसटी व पास व्यवस्था नसेल तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा दिला. 

व्यवस्थापकांनी मागितली माफी

आगारात असणार्‍या पासबाबत होणारी अडचण, बसेस थांबा घेत नाहीत तसेच  शाळा, कॉलेजच्या वेळेत बसेस नसल्याच्या अडचणींबाबत अनेकदा सांगितले होते. मात्र व्यवस्थापकांनी यावर उध्दटपणे उत्तरे करत मुलींना अपशब्द वापरत असल्याचे विद्यार्थीनींनी सांगितले. यामुळे ‘मनसे’ने आक्रमक भूमिका घेतली. यामुळे व्यवस्थापक पाटील यांनी विद्यार्थीनींची माफी मागत मागण्या मान्य करणार असल्याचे सांगितले.