होमपेज › Satara › विद्यार्थ्यांनी घेतली झाडे दत्तक : ‘वसुंधरा वाचवा’चा संदेश

आरेमध्ये फुलतेय शहीद कर्नल संतोष वनराई

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 08 2017 10:17PM

बुकमार्क करा

परळी : वार्ताहर

आरे, ता. सातारा या डोंगर कपारीतील गावातील ‘शहीद कर्नल संतोष महाडिक वनराई’ फुलू लागली असून त्यासाठी ग्रामस्थ व विद्यार्थी अतुलनीय योगदान देत आहेत. ‘वसुंधरा वाचवा’चा संदेश देत शिवतेज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड दत्तक घेतले असून त्याच्या संवर्धनाची काळजी घेतली जात आहे. या अनोख्या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थ व निसर्गप्रेमींकडून कौतुक होत आहे.

आरे हे सातारा तालुक्याच्या पश्‍चिमेकडील डोंगरदर्‍यात वसलेले गाव. येथील ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणाचा नारा देत वृक्षारोपणाचा निर्धार केला. त्याअनुषंगाने शहीद कर्नल संतोष महाडिक वनराईची संकल्पना पुढे आली. शहीद कर्नल संतोष यांच्या वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या हस्ते या वनराईचा शुभारंभही झाला. सव्वाशे चिंचेची झाडे या वनराईत फुलणार आहेत.

या चिंचेच्या रोपट्यांचे रोपण झाल्यानंतर शिवतेज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या वृक्षांच्या संवर्धनासाठी निर्धार केला आहे. आपुलकीच्या भावनेतून या रोपट्यांची काळजी घेतली जात असून पाणी व्यवस्थापनही करण्यात आले आहे.  बालकांच्या श्रमदानातून ही रोपटे आता विशाल वृक्षांकडे मार्गक्रमण करु लागली आहेत. या वनराईमुळे गावचे सौंदर्यही फुलणार असून उत्पन्‍नाचा स्रोतही उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शिवतेज विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते झपाटून काम करत आहेत.