होमपेज › Satara › कोयत्याचे घाव घालतच संसाराचा गाडा..!

कोयत्याचे घाव घालतच संसाराचा गाडा..!

Published On: Mar 07 2018 11:27PM | Last Updated: Mar 07 2018 8:15PMसातारा : मीना शिंदे 

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री सन्मानाचा माहोल सर्वत्र तयार झाला आहे. या सर्व वातावरणाशी दुरान्वये संबंध न आलेल्या अनेक कष्टकरी शेतमजूर तसेच ऊस तोड करणार्‍या महिला  जगण्यासाठी रोजच संघर्ष करत आहेत. या ऊसतोड करणार्‍या महिलांचा दिन उसाच्या फडात रोजच  प्रचंड कष्टाने साजरा होत असतो. 

पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारी स्त्री ही अबला नसून सबला झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच 8 मार्च हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी समाजातील असामान्य, कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान होतो. कधी काळी घरचा उंबरठाही न ओलांडणारी स्त्री आज चंद्रावर जाऊन आली. रुढी परंपरा चालीरिती, समाजाची बंधने या सर्वांना झुगारुन बंधनातून बाहेर पडून स्त्रीयांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.  

ग्रामीण भागातील दुर्लक्षित महिलांही आज समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. बचत गट, शिक्षण आदिंमुळे महिला एकत्रित येवून आरोग्य, दैनंदिन गरजांचे विविध प्रश्‍न यावर चर्चा करु लागल्या आहेत. बचतीचे महत्त्व ओळखून छोटे छोटे  गृहउद्योग उभे करु लागल्या आहेत. ही बाब ग्रामीण भागाच्या दृष्टीने नक्कीच आदर्शवत आहे.

जागतिक महिला दिनी अशा कर्तृत्वसंपन्न स्त्रियांचा सन्मान होऊन त्यांना उंची प्राप्त व्हावी, त्यांचे कर्तृत्व समाजाला समजावे यासाठी यादिवशी भरीव व अतुलनीय काम करणार्‍या महिलांचा वेगवेगळ्या पातळीवर सन्मान केला जातो. मात्र, समाजात  आजही अशा अनेक कष्टकरी वर्गातील महिला आहेत, ज्यांच्या वाट्याला केवळ उपेक्षा आली आहे. यापैकीच एक बाहेरील जिल्ह्यातून ऊसतोडीसाठी येणार्‍या महिला कामगार आहेत. ज्यांच्या पाचवीलाच संघर्ष पुजला आहे.

ऊस तोड कामगार महिलांना  उसाच्या फडात दिवसभर ऊसाच्या मोळ्या बांधून डोक्यावरुन वहाव्या लागत आहेत. दिवसभर उसाच्या फडात कोयत्याचे घाव घालत संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. नगर, उस्मानाबाद, बीड यासह विदर्भ मराठ वाड्यातील  ऊसतोड मजुरांच्या टोळ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील उसाच्या पट्ट्यात ऊसतोडीचे काम करण्यासाठी गळीत हंगामात स्थलांतरीत  होतात. या टोळ्यांमधील महिला या रोजच नवा लढा देत असतात. या मजुरांच्या महिलांना एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गावाच्या बाहेर माळरानावर वास्तव्यामध्ये त्यांना धड  निवारा मिळत नाही मग इतर सुविधा तर दूरची गोष्ट आहे.

भल्या पहाटे  उठून पोटाची सोय करतच आपले दैनंदिन  व्यवहार उरकावे लागतात. शेताकडेला सुरु असलेल्या पाण्याच्या पाईपवरुन पाणी भरायचे. भाकरीची शिदोरी बांधून सकाळी दिवस उगवायला आत शेताच्या बांधावर पोहोचायचे. कुणाचे तान्हुले पालावर  तर कुणाचे उसाच्या  शेतात बनवलेल्या छोट्या झोपाळ्यात निजलेले  असते.  अशा एक ना अनेक समस्यांशी धीराने लढणार्‍या या कष्टकरी महिलांना  जेव्हा समाजात सन्मान मिळेल तेव्हाच खर्‍या अर्थाने महिला दिनाचे सार्थक होईल.

ऊन-वार्‍यातही कष्टाला अंत नाही...

ऊन वार्‍याची तमा न बाळगता सपासप ऊस तोडायचा. मोळ्या बांधायच्या.  ट्रक ट्रॉलीमध्ये त्या भरायच्या, असा त्यांचा उद्योग सुरू असतो.  माय ऊस तोडत  असते. अन् पाच ते सहा वर्षांची पोरं-पोरी आपल्या लहानग्यांची माय होऊन सांभाळ करतात. बर्‍याचदा पाच ते दहा वर्षांच्या मुली पालावर राखणीला व तान्हुल्यांना सांभाळण्यासाठी ठेेवल्या जातात.