Thu, Apr 25, 2019 15:59होमपेज › Satara › कराड उत्तरेत काँग्रेस - राष्ट्रवादीत संघर्ष अटळ

कराड उत्तरेत काँग्रेस - राष्ट्रवादीत संघर्ष अटळ

Published On: Jun 16 2018 1:32AM | Last Updated: Jun 15 2018 10:10PMकराड : चंद्रजित पाटील 

कराड उत्तरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होऊन कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत राष्ट्रवादीविरोधातील राग व्यक्त केला. त्याचवेळी नामोल्लेख टाळत आ. आनंदराव पाटील यांची भूमिकाच चुकीची असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यामुळेच आ. पृथ्वीराज चव्हाण आता कोणता निर्णय घेणार? उत्तरसह जिल्ह्यातील काँग्रेस दुभंगणार का? असे प्रश्‍न निर्माण झाले असून उत्तरेतील संघर्षावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.

कराड उत्तरमधील काँगे्रस कार्यकर्त्यांनी आजवर राष्ट्रवादीकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडत कोणत्याही स्थितीत विधानसभा निवडणुकीत धैर्यशिल कदम यांनी निवडणूक लढवलीच पाहिजे, अशी एकमुखी मागणी केली. विशेष म्हणजे आ. आनंदराव पाटील यांच्यासह अविनाश नलवडे, नंदकुमार जगदाळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जाहीर केल्याप्रमाणे कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मात्र त्यानंतरही जिल्हा परिषद सदस्य निवासराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, माजी सभापती हिंदुराव चव्हाण यांच्यासह कराड उत्तरेतील बहुतांश काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी गुरूवारच्या मेळाव्याला उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून धैर्यशिल कदम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. विशेष म्हणजे हॉलमध्ये बसायलाही जागा नव्हती आणि त्यामुळेच शेकडो लोकांना हॉलमध्ये येण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पायरालगत बसावे लागले होते. आ. जयकुमार गोरे यांनीही थेट विधानसभेच्या मुद्द्यालाच हात घालत ज्या ज्या लोकांना काँग्रेसने उत्तरमधून निवडणूक लढवावी असे वाटते, त्यांनी हात वर करण्यास सांगितले. यावर सर्वांनी हात वर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय आ. जयकुमार गोरे यांनी हीच निष्ठावंत काँग्रेस असल्याचे सांगत कोणाचाही नामोल्लेख न करता ‘आपल्या पाठीमागे वळून पहा, कोणी शिल्लक राहिले आहे का ?’ असा सल्ला देत पक्षातंर्गत विरोधकांवर इशाराच दिला आहे.

धैर्यशिल कदम यांनीही आपण निवडणूक लढवणारच, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. सध्यस्थिती पाहता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस - राष्ट्रवादीचे जागा वाटप झाल्यास राष्ट्रवादीकडे राहण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमध्ये आघाडीत बिघाडी होणार, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण या प्रकरणात कोणती भूमिका घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

कराडचे राजकारण निर्णायक वळणावर....

गेल्या आठवडाभरापासून काँग्रेसतंर्गत आरोपप्रत्यारोपांमुळे कराड तालुक्याचे राजकारण निर्णायक वळणावर पोहचले आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही भूमिका घेतली? तरी त्याचे परिणाम कराडच्या राजकारणावरच होणारच आहेत.