होमपेज › Satara › मलकापूरमध्ये काँग्रेसचा जल्लोष

मलकापूरमध्ये काँग्रेसचा जल्लोष

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 30 2018 10:16PMकराड : प्रतिनिधी 

मलकापूर नगरपंचायतीला ‘क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर सत्ताधारी काँग्रेस समर्थकांनी एकच जल्लोष केला. शहरातून मोटारसायकल रॅली काढून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी नागरिकांनीही मोठ्या उत्साहात रॅलीत सहभागी होत या निर्णयाचे स्वागत केले. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. या रॅलीत नगरसेवकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

मलकापूर नगरपंचायतीचे ‘क’ वर्ग नगरपरिषदेत रुपांतर व्हावे, म्हणून सत्ताधारी गटाकडून गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरु होते. राज्य शासनाकडून नगरपरिषदेचा निर्णय अपेक्षित असतानाही राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याची भावना सत्ताधारी मनोहर शिंदे, त्यांचे सहकारी तसेच नागरिकांची झाली होती. त्यातच सत्ताधार्‍यांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने निवडणूक आयोगाने नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रियाही सुरु केली होती.  

नगरपरिषदेसाठी पुरेशी लोकसंख्या असतानाही मलकापूरपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या दोन शहरांना राज्य शासनाने नगरपरिषदेचा दर्जा दिला. मात्र, मलकापूरबाबत दुजाभाव होत असल्यानेच सत्ताधार्‍यांकडून  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरही राज्य शासनाने वेळकाढूपणा करण्याचे धोरण अवलंबल्यानंतर न्यायालयाने कडक शब्दात समज देत चार आठवड्यात मलकापूरबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने मंत्तिमंडळाची उपसमिती नेमून निर्णय घेण्यास सांगितले. या उपसमितीने बैठकीत निर्णय घेऊन 27 जुलैला त्याबाबतची अधिसूचना काढली. ती अधिसूचना न्यायालयात सादर केल्यानंतर मलकापूरला नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्याचे स्पष्ट झाले.  दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाने न्याय मिळाल्याचे सांगत सत्ताधारी गटाचे कार्यकर्ते नगरपंचायत कार्यालयासमोर जमले. बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, नारायण रैनाक, लक्ष्मण येडगे, गजेंद्र बुधावले, धनराज शिंदे, राहूल पाटील, प्रशांत चांदे, सुरेश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गुलालाची उधळण करण्यास सुरवात केली. तसेच यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 

याचवेळी नगरपंचायतीसमोरून मोटारसायलक रॅलीस प्रारंभ झाला. तेथून रॅली लक्ष्मीनगर येथे आली. त्यानंतर माजी आ. भास्करराव शिंदे यांच्या घरासमोरून रॅली मलकापूर फाटा, खंडोबानगर, कोयनावसाहत, ढेबेवाडी फाटा, आगाशिवनगर मार्गे रॅलीचा कोल्हापूर नाक्यावर समारोप झाला. या रॅलीवेळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. तसेच नगरपरिषदेची मान्यता मिळाल्याने जल्लोषही केला.