Wed, Nov 21, 2018 11:32होमपेज › Satara › ‘ते’ वक्‍तव्य म्हणजे विनयभंगच

‘ते’ वक्‍तव्य म्हणजे विनयभंगच

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 10:18PMकराड ः प्रतिनिधी

भाजपाचे आ. राम कदम यांनी महिला, युवतीबाबत केलेले वक्तव्य हा त्यांचा अवमानच आहे. विनयभंगासारखाच हा प्रकार असून या कायद्यान्वये आ. कदम यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कराड नगरपालिकेतील विरोधी लोकशाही आघाडीने निवेदनाद्वारे केली आहे.

लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेविका अनिता पवार, सुनंदा शिंदे, पल्लवी पवार, वैभव हिंगमिरे यांच्यासह माजी नगरसेवक सुहास पवार, अरूणा जाधव, ज्योती बेडेकर, नंदकुमार बटाणे यांच्यासह लोकशाही आघाडीचे आजी - माजी पदाधिकारी यांनी निवासी नायब तहसिलदार अजित कुर्‍हाडे यांना गुरूवारी दुपारी निवेदन दिले.

दहिहंडी कार्यक्रमावेळी महिला, युवतींबाबत आ. कदम यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. महिलांना तुच्छ लेखण्याची मानसिकता यातून स्पष्ट होते. युवती, महिलांच्या युवतीविरूद्ध कृती करणे हा गुन्हा आहे, हे माहिती असूनही आ. कदम यांनी केलेले वक्तव्य पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठिशी घालू नये. हा विनयभंगाचाच एक प्रकार असून या कायद्याप्रमाणे कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. आ. कदम यांच्यावर कारवाईस टाळाटाळ झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी लोकशाही आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

आ. कदम यांची हकालपट्टी करण्याचीही मागणी...

राम कदम हे आमदार म्हणून काम करण्यास लायक नाहीत. त्यांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, असे राज्यातील लोकांचे मत आहे. या मताचा मुख्यमंत्र्यांनी आदर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.