Wed, Mar 27, 2019 00:31होमपेज › Satara › ग्रामीण भागामध्ये ‘स्मोकिंग स्पॉट’ वाढले

ग्रामीण भागामध्ये ‘स्मोकिंग स्पॉट’ वाढले

Published On: Feb 23 2018 1:17AM | Last Updated: Feb 23 2018 1:17AMसातारा : प्रतिनिधी  

दिवसेंदिवस बेरोजगारांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. व्यसनाधिनतेकडे वळलेली काही टोळकी नसते उद्योग वाढवत आहे. ग्रामीण भागात तर सायंकाळी व रात्रीच्यावेळी ठिकठिकाणी स्मोकिंग स्पॉट वाढत चालले आहेत. त्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्‍त केली जात आहे. 

महाविद्यालयांतून पदवीधर होऊन बाहेर पडलेले तरूण, विविध कोर्सेसची पदवी संपादन केलेले तरूण यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तरुणाईला विधायक दृष्टीकोण असला तरी काही उपद्व्यापी टोळकी भानगडी वाढवत आहेत. कोणत्याही क्षेत्रात नोकरी मिळत  नसल्याने काही तरूण हताश झाले आहेत. व्यवसाय, धंदा करण्यासाठी आवश्यक भांडवल जवळ नाही. ज्यांच्याजवळ भांडवल आहे, मात्र व्यवसाय करण्याची मनोवृत्ती नाही. उच्चशिक्षित असल्याने धंदा, व्यवसाय करताना मानसिकता निर्माण होत नाही. अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहतींचा प्रश्‍नही प्रलंबितच आहे. यामुळे हताश झालेल्या काही तरूणांचे भवितव्य अंध:कारमय बनले आहे. विवेकशून्य बनलेला हा तरूण मित्रांच्या संगतीमुळे, मजा, ऐश, गंमत म्हणून व्यसनाधिनतेच्या मार्गाने चालत आहे. दिवसेंदिवस हा प्रवाह वाढतच आहे.

ग्रामीण भागात सायंकाळी व रात्रीच्यावेळी काही तरूणांचे टोळके निवांत ठिकाणी धूर सोडत असतानाचे चित्र आहे.  तरूण वर्गातील काही  मुले मुक्तपणे सिगारेट ओढताना दिसत असून सिगारेटच्या थोटक्यांचा खच पडलेला दिसत आहे. पालक वर्गापासून, समाजापासून दूर राहून हा वर्ग आपल्याच धुंदीत  आयुष्य जगत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. विविध कारणानिमित्त मद्य प्राशनासहित स्नेह भोजनाचे कार्यक्रमही साजरे होताना दिसतात. त्यामुळे या ठिकाणांचे नामकरण काहीजण स्मोकिंग स्पॉट म्हणून करत आहेत.

व्यसनाधिनतेकडे वळलेल्या या तरूणांतील काहींची मनोवृत्ती विकृत बनत चालली आहे. महिला व मुलींची छेड काढणे, अर्वाच्च भाषेचा वापर करणे इ. काही युवक करत असतात. यामुळे महिला व मुलींमध्ये भितीचेही वातावरण निर्माण होत असते. देशाचे भविष्य समजले जाणार्‍या या तरूणांना जबाबदारीची जाणीव, स्वत:च्या विकासाबरोबर देशहिताची समाजहिताची जाणीव निर्माण होण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाची गरज आहे. पालक वर्गांनी आपल्या पाल्याकडे मित्रत्वाच्या नात्याने पाहून जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक बनले आहे. नाहीतर भरकटलेला हा तरूण वाममार्गावर जाण्यास वेळ लागणार नसल्याचे बोलले जात आहे.