Wed, Apr 24, 2019 07:34होमपेज › Satara › बुंध्यात विस्तव टाकून झाडांच्या कत्तली

बुंध्यात विस्तव टाकून झाडांच्या कत्तली

Published On: Apr 30 2018 1:47AM | Last Updated: Apr 29 2018 7:46PMपरळी : वार्ताहर

सातारा- परळी मार्गावर इंग्रजांच्या काळात लावण्यात आलेले वडाचे व जांभळीचे वृक्ष येणार्‍या जाणार्‍या वाहनधारकांना तसेच पर्यटकांना आपली सावली देत. त्यामुळे या मार्गावरचा प्रवास आलाददायक असायचा. मात्र, काही वर्षात हे चित्र पालटले असून बोगदा, खंडोबाची खोरी, डबेवाडी ते उरमोडी नदीवरील पूल या मार्गावरील वृक्ष बोडके झाले आहेत. काही विघ्नसंतोषी लोकच झाडाच्या बुध्यांत विस्तव टाकून ही वृक्षसंपदा नष्ट करत आहे. यावर वन विभागाने तातडीने कारवाई करणे गरजेचे बनले आहे. 

शासन एकीकडे झाडे लावा झाडे जगवा हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोटी वृक्ष लागवड करीत आहे. असे असताना दिवसाढवळ्या झाडाच्या बुध्यांत, खोडात विस्तव टाकून महाकाय वृक्ष जमीनदोस्त केले जात आहेत. याचा सुगावाही बांधकाम विभागाला, वन विभागाला लागत नाही, ही आश्‍चर्याची गोष्ट नाही का? गेल्या पंधरा दिवसात उरमोडी नदी पुलानजीक दोन महाकाय वृक्ष झाडाच्या बुंध्यात विस्तव टाकून पाडण्यात आले. या कृत्यामुळे पर्यावरण व निसर्ग प्रेमीच्यात संतापाची लाट उसळली आहे.वृक्षांना आग स्थानिक लोक वखार व्यवसायिक यांच्याकडून लावली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

ही पेटलेली झाडे रहदारीच्या मार्गावर पडून अपघात होण्याची शक्यता असते. गेल्या वर्षीच परळी येथील व्यवसायिक सचिन बोबडे यांच्या चारचाकी वाहनावर झाड पडले होते. झाडाच्या बुंध्यात चिंध्या कोंबून त्यात रॉकेल, पेट्रोल ओतून ही आग लावण्याच्या नामी शकली वापरल्या जात आहेत. निसर्गाने विपुल प्रमाणात वनसंपदा दिली आहे. त्याचे जतन करण्याची जबाबदरी प्रत्येकाची आहे. निसर्गाचा वनसंपदेचा र्‍हास म्हणजे मानवी जीवन ही र्‍हासाकडे अशी परिस्थिती आहे. जे कोणी अशी गैरकृत्य करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

झाडांच्या रांगा गेल्या अन् उन्हाचा पारा वाढला

सातारच्या बोगद्यातून बाहेर आल्यानंतर जांभूळ, वट अशां झाडाच्या रांगा होत्या. ऐन उन्हाळ्यातही जांभूळणी भरलेली ही झाडे येणार्‍या जाणार्‍या वाहनधारकांना, पर्यटकांना आकर्षित करत होती. मात्र, या पट्ट्यातील झाडेच आता गायब झाली आहे. त्यामुळे येथील अल्हाददायक प्रवास संपुष्टात आले. गेल्या काही वर्षांपर्यंत दिसणार्‍या झाडांच्या रांगा दिसेनाशा झाल्या असून सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे तापमानाचा पारा सतत वाढतच चालला आहे.