Tue, Mar 26, 2019 21:56होमपेज › Satara › ‘लोकवर्गणी’तून उभी राहणार शाळेची इमारत

‘लोकवर्गणी’तून उभी राहणार शाळेची इमारत

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 9:03PMउंब्रज : सुरेश सूर्यवंशी

कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने शाळेच्या नव्या इमारतीसाठी निधी जमविणे हे जिकिरीचे आणि कष्टाचे असते. मग ती शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेची असो किंवा खासगी. गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळत पडलेल्या शाळा खोल्यांच्या प्रश्‍नाला लोकवर्गणी हाच मार्ग मोठा असल्याचा निष्कर्ष पालकांनी काढला आहे. दरम्यान, लोकवर्गणीतून प्रशस्त शाळा खोल्या उभारण्याचा चंग पालकांनी बांधला असून, त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

जिल्ह्यात सर्वात मोठ्या पटाची प्राथमिक शाळा म्हणून उंब्रज येथील मुला व मुलींची प्राथमिक शाळा ओळखली जाते. जवळपास 700 च्या आसपास शाळेचा पट असून, केंद्रशाळा म्हणूनही ही शाळा ओळखली जाते. शाळेची धोकादायक इमारत दोन वर्षापूर्वी पाडण्यात आली. 

परिणामी दोन सत्रात शाळा भरवावी लागत आहे. शाळेसाठी वाढीव खोल्या तातडीने मिळाव्यात यासाठी पालकांनी यापूर्वी अनेकवेळा वेगवेगळया प्रकारची आंदोलने करून जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा व तालुका प्रशासनाला धारेवर धरले. मात्र निधी उपलब्ध होवू  शकला नाही. सद्यस्थितीस शाळेसाठी दहा खोल्यांची आवश्यकता आहे. मात्र पाच खोल्यांचा निधी उपलब्ध झाला असून, उर्वरीत पाच खोल्या या शासनाच्या निधीची वाट न पाहता लोकसहभागातून पाच खोल्यांचे बांधकाम करण्यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सरपंच सौ.लता कांबळे, उपसरपंच अजित जाधव, दिगंबर भिसे, सुधाकर जाधव, सुधीर जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पालक यांनी सहभाग घेतला.

लोकसहभागातून इमारत बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर या बांधकाम खोल्याची स्वतंत्र सर्वसमावेशक महिलांच्या सहभागासह समितीची स्थापना करून ही समिती या बांधकामावर देखरेख करेल असा निर्णय यावेळी घेण्यात आला.    

दरम्यान, लोकसहभागातून शाळा खोल्या बांधण्याचे निश्‍चित झाल्यानंतर लोकवर्गणीचा प्रश्‍न उपस्थित होताच उंब्रज येथील भैरवनाथ विट उत्पादक संघाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी शाळेच्या इमारत बांधकामासाठी लागणारी संपूर्ण विट देण्याचे जाहीर केले. केंद्र प्रमुख आनंदा शिंदे यांनी 25 हजार, पै.प्रल्हाद जाधव यांनी 21 हजार, छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे सचिन डुबल यांनी एकवीस हजार, ग्रा.पं.सदस्य जयवंत जाधव यांनी पंचवीस हजार, प्रहार संघटनेकडून अकरा हजार अशी मदत जाहीर होताच उपस्थित पालकांनी जोरदार स्वागत केले. तसेच शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी पालकांनीही आपल्या परीने सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन करण्याबरोबरच शाळेस मदत देणार्‍यांनी शाळेचे मुख्याध्यापक व उपशिक्षक सागर जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

 

Tags : satara, Umbraj news, school building, people participation,