Sat, Aug 24, 2019 19:09होमपेज › Satara › पीक कर्जाचा महाघोटाळा बाहेर येणार

पीक कर्जाचा महाघोटाळा बाहेर येणार

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 11 2018 11:31PMकुडाळ : इम्तियाज मुजावर

जावली तालुक्यातील कुडाळ करंदी परिसरातील  एकूण सात  शेकर्‍यांची पीक  कर्जातील   23 लाखांची अफरातफर करून शेतकर्‍याची फसवणूक करणारा कुडाळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा मॅनेजर मनोज लोखंडे  फरार असल्याची माहिती मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन माने यांनी दिली. आणखी मोठा पीक कर्जाचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यामुळे लाखो रुपयांचा घोटाळा करून  ‘गेला मॅनेजर कुणीकडे’ असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. 

शेतकर्‍यांच्या पीक कर्जातील एका एजंटला हाताशी धरून लाखो रुपये गिळंकृत करणारा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा मॅनेजर मनोज लोखंडे हा कुडाळकरांसाठी ‘तो मी नव्हेच’ नाटकातील लखोबा लोखंडे  ठरला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून उमटू लागल्या आहेत. मॅनेजर मनोज लोखंडेसह शिपायाने करंदी तर्फ कुडाळ येथील एजंट मंगेश निकम यांच्यामार्फत पीक कर्जमध्ये लाखो रुपयांची अफरातफर करत शेतकर्‍याची फसवणूक केल्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात लोखंडेसह तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  दरम्यान, या फसवणूक प्रकरणातील बँकेचा शिपाई व एजंट मंगेश निकम सध्या मेढा पोलिस च्या लॉकपमध्ये बंद आहे. बँक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेच्या भोंगळ कारभाराचे रोज कारनामे घेऊन मेढा पोलीस ठाण्यात शेतकर्‍यांची  रीघ लागायला सुरूवात झाली आहे.

सुरूवातीला 2 लाख 96 हजाराची पीक कर्जाची फसवणूक झाली असल्याची तक्रार करंदी आखेगनी येथील सात शेतकर्‍यांनी मेढा पोलीस ठाण्यात  दाखल केल्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून त्यामागची  सत्यता आढळून आली.  तात्काळ बँकेमध्ये घोटाळा केलेल्या अधिकार्‍याला कोणतीही संधी न देता  अटक करण्याची मोहीम आखली. मात्र बॅक मॅनेजरऐवजी शिपाई व एजंट हाताशी लागला  व मनोज लोखंडे हा केलेले पाप अंगलट येणार या भीतीने फरार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बँक मॅनेजर लोखंडेने मोठ्या चलाखीने कागदोपत्री कुठंही अडचणीत येणार नसल्याची काळजी घेतली असली तरी शेतकर्‍यांची कर्ज प्रकरणे व एजंट च्या या प्रकरणातील सहभाग, खात्यावर जमा होणारी रकमेची अफरातफर यामध्ये भानगडी झाल्याचे स्पष्ट होताना समोर आले आहे. त्यामुळे ‘तो मी नव्हेच’ म्हणणारा लखोबा लोखंडेसारखा मनोज लोखंडे मेढा पोलिसांच्या ताब्यात कधी येणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.