Tue, May 26, 2020 18:33होमपेज › Satara › या ‘दुर्गे’चं भवितव्य आजही अधांतरीच 

या ‘दुर्गे’चं भवितव्य आजही अधांतरीच 

Published On: Oct 16 2018 2:00AM | Last Updated: Oct 15 2018 8:39PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दुर्गा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. एका बाजूला आई जगदंबेचा ‘उदे गं अंबे उदे’ चा जयघोष तर दुसरीकडे मुली, तरूणी, महिला यांचा उधो, उधो सुरू आहे. त्याचवेळी आजही दोन वेळच्या पोटाची भूक भागविण्यासाठी त्याच मुलीला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आई, बापाच्या पोटाला तीन तीन पोरं आणि त्यांना जगवायचं आव्हान आ वासून उभं असल्यानं खरचं कुटुंब नियोजन असो किंवा बेटी बचाओ, बेटी पढाओ चा नारा तळागाळापर्यंत पोहोचला आहे का ? असा सामाजिक प्रश्‍न निर्माण होत आहे.

समाज असो किंवा शासन हे विविध पातळ्यांवर मुली, महिला यांच्यासाठी बरचसं केल्याचं सामाजिक चित्र निर्माण करतो. मात्र त्याच महिलांच्या नेमक्या दुर्गोत्सवात ‘मि टू’ सारखी वादळं उठतात यावरूनच आपल्याकडे महिला किती सुरक्षित आहेत याच विदारक सत्य समाजासमोर येतं.  कुटुंब कल्याण मोहिम आजही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली नसल्याने मग त्याच्या फायदा, तोट्याची पुसटशी कल्पना अनेकांना नाही. त्यामुळे निसर्ग नियमाने जन्म द्यायचा आणि वाट्टेल ते करून पोटच्या पोरांची भूक भागवायची हा एकच धर्म व कर्तव्य. मग कसलं शिक्षण आणि कसली सुरक्षा? रस्त्यावरच जन्मायचं त्याच रस्त्यावर कसरती करून जगायचं आणि एक दिवस त्याच रस्त्यावर शेवटचा श्‍वास सोडायचा एवढचं साचेबद्ध जीवन जगणार्‍याचं हे भिषण वास्तव. 

स्वाभाविकच मग पोटच्या गोळ्यांना तारेवरची कसरत करायला लावताना त्याच तारेखाली तिचा तोल जावून पडली तर हाताची झोळी करणारा‘बाप’. तर त्या कसरतींचा पाया हा तकलादू असल्याने पोटाजवळ नुकताच जन्माला आलेला तिसरा गोळा संभाळत पुन्हा तारेवरच्या मोठ्या गोळ्याची खबरदारी घेण्यासाठी असणारा बांबू व तार जपणारी ‘माऊली’ आणि तिसरीकडे आता कुठं याच बालपणं सुरू झालं,  खेळण्या बागडण्याच्या वयातच आपल्या तारेवरच्या कुटुंबियांची जबाबदारी तितक्याच जबाबदारीने संभाळणारा तिचा छोटा ‘भाऊ’ असं हे तारेवर अधांतरी भवितव्य असणारं हे कुटुंब पाहिल्यावर मग अशा’ दुर्गेच ’ भवितव्य अधांतरीच ठेवायला नक्की जबाबदार तीचे पालक, समाज की शासनव्यवस्था याचा प्रश्‍नही तीच्या दैनंदिन जीवनाप्रमाणेच अधांतरी रहातो हे नक्कीच.