Mon, Aug 19, 2019 11:32होमपेज › Satara › पाण्यासाठी जावली तालुक्यात बोरीचा बार 

पाण्यासाठी जावली तालुक्यात बोरीचा बार 

Published On: May 12 2018 1:32AM | Last Updated: May 11 2018 10:40PMकुडाळ  : प्रतिनिधी

तीव्र उन्हाळ्यात एका हंडाभर पाणी मिळावे म्हणून एकवटलेल्या जावली तालुक्यातील  डोंगरी भागात असणारे दुंंद आणि ऐकीव  गावच्या सरहद्दीवर आज चक्‍क  बोरीचा बार  भरला. तोडलेली पाईप जोडणी साठी गेलेल्या दुंद ग्रामस्थांना विरोध केल्याने दुंद व  ऐकीव ग्रामस्थ महिलांमध्ये तुफान शिवीगाळ व बाचाबाची झाली.  गेल्या अनेक दिवसांपासून दुंंद गावाला ऐकीव गावच्या पाईपमधून पाणी देण्याची सोय करण्यात आली होती. दुंंद गावातील लोकांनी लोकवर्गणीतून गावात ऐकीव सरहद्दीतून पाणी आणलं होतं. मात्र  दुंंद ग्रामस्थांच्या दिलेल्या माहिती वरून स्थानिक राजकारणापोटी दुंद गावच्या दिशेने ऐकीवमधून जोडलेली पाईप कुण्या समाजकंटकाने तोडली व त्यानंतर गावाला पाणी मिळण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली. या घटनेकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही. उन्हाळा सुरू होताच पाण्यासाठी होणारी वणवण रोज होणारी फरपट याला कंटाळून सकाळी दुंंद ग्रामस्थ महिला यांनी क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला. एकवटलेल्या महिलांनी  व ग्रामस्थांनी ऐकीव गावातील पाईप जोडून गावात मुबलक पाणी आणण्याचा निर्धार केला.  ग्रामस्थ, महिलांसंह आज दुपारी एकीव येथे गेल्यावर एकीव ग्रामस्थ, महिला विरूद्ध दुंद ग्रामस्थ,  महिला असा  पाण्यावरून जोरदार  संघर्ष सुरू झाला.

स्थानिक राजकारणातून हा प्रकार घडल्याची परिसरात चर्चा आहे. शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तणावाचे बनले होते.पण काही शांतताप्रिय ग्रामस्थांमुळे हा राडा थांबून मोठी हाणामारी टळली. दरम्यान, संतप्त दुंद व ऐकीव चे ग्रामस्थ यांच्यातील पेटलेली संघर्षाची ठिणगी कोणते रूप धारण करणार? हे  येणारा काळच सांगेल. पावसाच्या जावलीत पाण्यासाठी सरहद्दीवर झालेला बोरीचा बार तालुक्यावर राज्य करणार्‍या स्थानिक झेडपी व पंचायत समितीच्या नेत्यांना खाली माना  घालायला लावण्यासारखा प्रकार घडला आहे. इतकं होऊन देखील एकाही स्थानिक स्वराज्य संस्था नेत्याने काय घडलं याची चौकशी देखील केली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी जावलीत एकमेकांची डोकी फुटण्याची वेळ आली असताना नेतेमंडळी मात्र या प्रकाराचा आनंद घेत बसली आहेत.