Tue, Mar 19, 2019 03:38होमपेज › Satara › मराठी अभिजातसाठी मुख्यमंत्र्यांची भूमिका अभिनंदनीय 

मराठी अभिजातसाठी मुख्यमंत्र्यांची भूमिका अभिनंदनीय 

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:16PMसातारा : प्रतिनिधी

बडोदे येथील 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी पंतप्रधानाकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेऊन भेटूही अशी  जाहीर केलेली भूमिका अभिनंदनीय आहे. हा प्रश्‍न ऐरणीवर आणण्यासाठी मसाप, शाहूपुरी शाखेने पुढाकार घेतला होता. गेले वर्षभर या सर्व प्रक्रियेत मी सहभागी असून दिल्लीत झालेल्या प्रार्थना आंदोलनाचे नेतृत्वही केले होते. त्यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळात सातारा जिल्हयातील प्रतिनिधींचा मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांनी समावेश करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव गेली चार वर्षे धूळ खात पडला होता. मसाप, शाहूपुरी शाखेच्यावतीने गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पत्रे पाठवून या चळवळीचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर वर्षभर विविध आंदोलने करण्यात आली. मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ यांनी या प्रश्‍नांवर सातारकरांच्या सहकार्याने चळवळ उभी केली.

विनोद कुलकर्णी यांनी सातत्याने पंतप्रधान कार्यालय, विविध केंद्रीय मंत्री, विविध पक्षाचे राजकीय नेते यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यातूनच या प्रश्‍नाची सद्यस्थिती काय हे स्पष्ट  झाले. या पाठपुराव्यामुळेच मद्रास हायकोर्टातील यासंदर्भात असलेली याचिका निकाली निघाली असून पुन्हा एकदा कृतीशील कार्यवाही सुरु झाली आहे. केवळ केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अभिजातचा धूळ खात पडलेला प्रस्ताव सातारा जिल्हयाने उभ्या केलेल्या चळवळीमुळे आता अंतिम टप्प्यात आला आहे.  

विविध प्रकारे पाठपुरावा करुनही प्रश्‍न न सुटल्याने आंदोलनाची भूमिका घेण्यात आली. याप्रकरणी मसापचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिलार येथे आले असताना त्यांना भेटून याप्रश्‍नी सविस्तर माहिती दिली होती परंतु त्यानंतर काहीच न झाल्याने अखेर प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान कार्यालयासमोर विविध साहित्यिक, मसाप प्रतिनिधींच्या उपस्थितीत माझ्या नेतृत्वाखाली  धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांना मसापचे शिष्टमंडळ घेऊन भेटलो. त्यावेळी त्यांनी मराठीला अभिजात  भाषेचा दर्जा देण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

परंतु 26 जानेवारीपूर्वी काहीही ठोस निर्णय न झाल्याने अखेर दिल्लीत माझ्या आणि मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सदनातील श्री.छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर केंद्र सरकारला हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सद्विवेकबुध्दी द्यावी, यासाठी प्रार्थना आंदोलन करण्यात आले. त्यातही सातारा जिल्हयातील साहित्यिकांचा आणि साहित्यप्रेमींचा सिंहाचा वाटा होता. राज्यभरातून मराठीप्रेमी मोठया संख्येने सहभागी झाले होते. हा प्रश्‍न सातारा जिल्हयाने उभ्या केलेल्या लढ्यामुळे ऐरणीवर आला असून या शिष्टमंडळात सातारा जिल्हयातील प्रतिनिधींचा समावेश करावा, असेही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी या पत्रकात म्हटले आहे.