Tue, Nov 19, 2019 12:40होमपेज › Satara › ठोसेघर-चाळकेवाडी रस्ता खचला

ठोसेघर-चाळकेवाडी रस्ता खचला

Published On: Jul 12 2019 1:59AM | Last Updated: Jul 11 2019 10:56PM
परळी : वार्ताहर 

परळी खोर्‍यात धुवाँधार पाऊस सुरू असून गुरुवारी सायंकाळी ठोसेघर-चाळकेवाडी रस्ता सज्जनगड फाट्याजवळ खचला. येथील रस्त्याचा भराव वाहून गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्यामुळे येथील जनजीवन पूर्णत: कोलमडून पडले आहे. 

परळी खोर्‍यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा ठोसेघर मार्गावर दरड कोसळली. गुरूवारी तर या परिसरात सकाळपासून पावसाचा जोर आणखी वाढला होता. त्यामुळे डोंगरकपारीतील खाचरे जलमय झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांना जलसमाधी मिळाली.  ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले. ठोसेघर मार्गावर  डोंगर दर्‍यातून वाहत येणारे पाणी रस्त्यावरून वाहत होते. सायंकाळी ठोसेघर-चाळकेवाडी रस्ता सज्जनगड फाट्याजवळ खचला. रस्त्याचा भराव पूर्णपणे वाहून गेला असून वाहतूक बंद पडली. रस्त्याचा काही भाग सकाळी कोसळू लागला होता. दिवसभराच्या पावसामुळे सायंकाळी रस्ताच वाहून गेला. सायंकाळी 6.30च्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी वाहनधारकांनी तत्काळ वाहने थांबवून या मार्गावर दगडी लावली व वाहतूक बंद केली.