Wed, Feb 26, 2020 21:24होमपेज › Satara › खळाळणारी नदीपात्रे आता राहिलीच नाहीत!

खळाळणारी नदीपात्रे आता राहिलीच नाहीत!

Published On: Jan 31 2019 1:33AM | Last Updated: Jan 30 2019 9:54PM
सातारा : सुनील क्षीरसागर 

नद्यांवर होणारी धरणे, बंधारे यामुळे अलिकडच्या काळात वाहणार्‍या नद्या पहायला मिळत नाहीत. त्याहूनही विशेष म्हणजे खळाळणारी नदी पाहिली की सोन्याहून पिवळं झाल्यासारखं वाटतं. 

अलिकडच्या काळात निसर्गाचं अर्थात ऋतूचक्रही बदलत आहे. त्यामुळे निसर्गाचा जो अनमोल ठेवा आहे तो अलिकडे दुर्मिळ होत असल्याचे चित्र आढळून येते. पूर्वी पावसाळ्यामध्येच पाऊस पडायचा आणि तोही गर्जत यायचा. त्यावेळी ओढे-नाले तुडूंब भरून वहायचे. नदीच्या पुरातून खळाळून वाहणारे पाणी पाहून भान हरपून जायचे.  त्यानंतरही वर्षभर बाराही महिने नदी खळाळतच असायची. गावाजवळच्या खोल डोहामध्ये तिचे वेगळेच रूप असायचे तर उथळ भागातून, दगडगोट्यातून वाहणारा तिचा प्रवाह तिला एक वेगळंच रूपडं बहाल करायचा. पावसाळ्यात वाहणारे गढूळ पाणी आठ महिने पुन्हा पांढरे शुभ्र... निळेशार व्हायचे, खडकावरून नदीत उड्या फेकताना ब्रह्मानंद व्हायचा. पात्रातील खोलगट भागात सुळका मारून तळातील वाळू हातात घेवून वर फेकून देणारा आनंद आता उरलाच नाही. कारण  नद्या आता वाहतच नाहीत...!

औद्योगिक व हरितक्रांतीने गावोगावी नद्यांवर बंधारे झाले आहेत, होत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी खळाळणार्‍या पाण्याला बांध  पडला आहे. त्यामुळे पाणीच आता संथ बनले आहे. या पाण्यातच गावागावातील गटार गंगा, कारखान्यातील तसेच कंपन्यांमधील प्रदुषित पाणी मिसळत असल्याने नदीचे अस्सल रूपडे आता हरवले आहे. अनेक ठिकाणच्या नद्यांची अशी दुर्गंध अवस्था झाली आहे.  उपसा सिंचन योजनांनीही नदीला वेढले असून या योजनांमुळे भविष्यात नदीपात्रात अडवलेले पाणी तरी पहायला मिळेल का? हा प्रश्‍नच आहे. 

कोरेगाव तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असणार्‍या ब्रह्मपुरी येथे परवा सहजच जाण्याचा योग आला. महाबळेश्‍वरातून उगम पावलेल्या कृष्णा नदीचे खळाळणारे पाणी... नव्हे खडकावरून रोरांवत वाहणारे पाणी पाहून भान हरपले आणि हे द‍ृष्य आपोआपच कॅमेर्‍यात कैद झाले.