होमपेज › Satara › सुर्ली घाट..लावतोय वाट...!

घाटरस्ते बनलेत ‘मृत्यूचे सापळे’

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 8:54PMनागमोडी व धोकादायक वळणे, संरक्षण कठड्यांची झालेली दुरावस्था, रिप्लेक्टरचा अभाव, वाहन धारकांकडून बेशिस्त व बेदरकारपणे चालवली जाणारी वाहने, अरुंद रस्ते रस्त्याच्या भोवती वाढलेली झाडी यासह विविध कारणांनी घाट रस्ते धोकादायक बनले आहेत. घाट रस्त्यांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष तसेच निकृष्ट कामामुळे रस्त्यावर पडणारे मोठमोठे खड्डे, डोंगरदर्‍यांमधील घाट रस्त्यांवर पावसाळ्यामध्ये कोसळणार्‍या दरडी, यू-टर्न बरोबरच धोकादायक असलेले चढ-उतार यामुळे घाटातील रस्ते म्हणजे जणू मृत्यूचे सापळे भासत आहेत. अंबेनळी घाटात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कराड ते पाटण तालुक्यातील कोयनानगर कुंभार्ली घाट, दिवशी घाट, उरुल घाट, विहे घाट, तसेच कराड तालुक्यातील सुर्ली व शामगाव घाट रस्त्यांचा व डोंगरदर्‍यातून असलेल्या लहान-मोठ्या रस्त्यांचा ‘पुढारी’ टीमने घेतलेला आढावा...

कराड : अमोल चव्हाण

कराड-विटा राज्यमार्गावर कराड पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर सुर्ली गावच्या हद्दीत असलेला घाट सध्या धोकादायक बनला आहे. घाटातील नागमोडी वळणे, कमी उंचीचे संरक्षण कठडे तसेच रस्त्यावरील खड्डे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेदरकारपणे चालवली जाणारी वाहने यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. यामुळे घाटामध्ये वारंवार छोटे-मोठे अपघात होत असून पावसाळ्यात तर हा घाट अधिकच धोकादायक बनत आहे.  

सुर्ली घाटामुळे कराड शहराशी  सुर्ली, कामथीसह कडेगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क होतो. सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली असून कमी उंचीचे संरक्षण कठडे, धोकादायक वळणे यामुळे हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. घाटातील अरुंद रस्ते व नागमोड्या वळणांमुळे घाटात अपघांताचे प्रमाण वाढले आहे. केवळ अरुंद रस्ता असल्यामुळेच काही दिवसांपुर्वी येथे एसटी व ट्रॅक्टरचा अपघात झाला होता. यावेळी एसटी चालकाला दगडांचा मारही खावा लागला. त्यापुर्वीही घाटातील मुख्य वळणावर एका एसटी चालकाने चकवा दिल्याने दुसर्‍या एसटी चालकाचा ताबा सुटल्याने एसटी डोंगराच्या बाजूला असलेला नाला पार करून डोंगराच्या कड्याला धडकली होती. त्याचवेळी जर एसटी रस्त्याच्या विरूध्द बाजूला गेली असती तर खोल दरीत कोसळून तर मोठा अनर्थ झाला असता. सुदैवाने  तसे घडले नाही व कोणतिही जिवीत हानी झाली नाही. मात्र, 10 ते 12 प्रवाशी जखमी झाले होते. म्हणूनच रस्त्याचे रुंदीकरण करून धोकादायक वळणे काढण्याबरोबरच संरक्षक कठड्यांची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. याचा विचार करून बांधकाम विभागाने काही ठिकाणी केवळ लोखंडी ग्रील लावले आहेत.   

सुर्ली घाट सुमारे दीड ते दोन किलोमिटर अंतराच्या या घाटातील रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. घाटात एखाद्या वळणावर दोन वाहने समोरासमोर आल्यास मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे बर्‍याचवेळा वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूकीच कोंडी होत असते.  सध्या साखर कारखाने बंद असले तरी ज्या वेळेस कारखाने सुरु असतात तेंव्हा घाटात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरसह इतर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. काहीवेळेस ट्रॅक्टर चालक धोका पत्करून एकाचवेळेस उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन घाट उतरत असतात.

त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनास त्याला ओव्हरटेक करत येत नाही. सुमारे अर्धातास उसाने भरलेल्या ट्रॉलीच्या पाठीमागून इतर वाहनांचा प्रवास करावा लागतो. याचा परिणाम म्हणून वाहनधारकांचा वेळ वाया जात असल्याने अनेकवेळा दोन्ही चालकांमध्ये बाचाबाची किंवा वादावादीचे प्रकार घडत असतात.  काही दिवसापुर्वीं घाटातील एका वळणावर उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्यामुळे सुमारे दोन तास घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. तर दुसर्‍या एका घटनेत एका वळणावर मोटरसायकल व ट्रक यांच्यात धडक होऊन अपघात झाला होता. त्यानंतर काही दिवसातच एसटी व ट्रॅक्टरचा अपघात झाला होता. यावेळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना समोरून दुसरे वाहन आल्याने चालकाने अचानकपणे एसटी डाव्याबाजूला ओढली. 

त्यामुळे ट्रॅक्टर एसटीला घासला. एसटी थांबविल्यानंतर संतप्त झालेल्या ट्रॅक्टर चालकाने एसटी चालकाला दगडाने मारहाण केली होती. घाटातील रस्ता अरुंद असल्यामुळेच हा अपघात होऊन एसटी चालकाला दगडांचा मार खावा लागला होता. जर रस्ता रुंद असता तर कदाचित ट्रॅक्टर चालकाला एसटी आडवी येत असताना आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर बाजूला घेता आला असता आणि अपघात टळला असता. पण तसे झाले नाही. केवळ रस्ता अरुंद व वळणे धोकादायक असल्यामुळेच अनेकवेळा असे छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे अनेकजण जखमी होण्याबरोबरच वाहनांचेही मोठे नुकसान होत असते.