होमपेज › Satara › उरुल घाटात कठडे तुटले

उरुल घाटात कठडे तुटले

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 8:50PMमारूल हवेली : धनंजय जगताप

पंढरपूर - चिपळूण राज्यमार्गावरील उरूल ( ता.पाटण ) येथील घाटाकडे धोकादायक घाट म्हणून पाहिले जाते. घाटात वहाने कोसाळून झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहनधारकांसाठी हा घाट मृत्युचा सापळा बनत असून घाटातील सुरक्षीत वाहतुकीचा प्रश्‍न कायमच ऐरणीवर येतो. सध्या या घाटातील संरक्षक कठडा तुटला असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. 

पाटण तालुक्यातील उरूल घाटात काही काळाच्या अंतरानंतर वहान अपघातांचे सत्र सुरूच असते. घाटात मोठे अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. होणार्‍या दुर्घनेत अनेकांना आपला जीव गममावा लागला आहे. त्यामुळे अंबनेळी घाटात झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर या घाटातील सुरक्षीत वाहतुकीचा प्रश्‍न पुन्हा एकदा समोर आला आहे.  अरूंद मार्गासह घाटातील भक्कम सुरक्षाकठड्यांचा अभाव व ठिकठिकाणी रिफ्लेक्टर नसल्याने येथील वाहतूक सुरक्षा राम भरोसेच आहे. उरूल घाटातून पाटण, उंब्रज मार्गे चिपळूण व पुणे, मुंबई दिशेला जाणार्‍या वाहनांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असते. रात्रीच्यावेळीही या मार्गावर  प्रवासी व मालवाहतूक गाड्यांचे प्रमाण जास्त आहे. बर्‍याच वेळा प्रवासी गाड्या वळणावर आल्या असत्या समोरून येणार्‍या गाड्यांना हुलकावणी बसते. त्यामुळे वहाने दरीत कोसळण्याची शक्यता असते. धोकादायक घाटामध्ये यापूर्वीही अनेकदा मोठ्या अपघाताच्या दुर्घटना घडल्या आहेत.

उरूल घाटात यापूर्वी कोयना प्रकल्पाची जीप वेगावर नियंत्रण न राहिल्याने दत्त मंदिरापासून खोल दरीत कोसळली होती. त्यामध्ये प्रकल्पाचे कर्मचारी जागेवर ठार झाले होते. त्यानंतर या घाटात बर्‍याच वेळा दुचाकी व चारचाकी वाहनांची टक्कर होऊन अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेकांना आपले अवयव गमवावे लागले होते. कोकणकडे निघालेला रसायनाने भरलेला टँकर ऐन पावसाळ्यात या घाटातून दरीत कोसळला होता.

सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी टँकरमधील रसायन पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले होते. त्यामुळे अनेक मासे मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळी नदीकाठच्या जनतेला हे पाणी पिल्यानंतर बाधा होऊ नये म्हणून कोयना धरणाच्या जलाशयातून पाणी सोडून रसायनयुक्त पाण्याची तीव्रता कमी करावी लागली होती. त्यानंतर याच ठिकाणी प्लॅस्टिकचे बॅरेल घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला होता. त्यात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच येथे एक वर्‍हाडाचा ट्रक घसरून पलटी झाला होता. सुदैवाने तो टेकडीकडील बाजूला पलटी झाल्याने गंभीर घटना टळली होती. हा ट्रक दरीच्या बाजूला कोसळला असता तर भयानक दुर्घटना घडली असती.

दिवसेंदिवस या मार्गावरील वाहनांची संख्या वाढत आहे. यामध्ये अवजड वाहनांसह प्रवासी वाहनांचा समावेश असतो. मात्र नागमोडी वळणाचा असणारा उरूल घाट प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे. तीव्र उतारासह नागमोडी वळणे असल्याने व पूर्वेला खोल दरी असल्याने हा घाट अपघात क्षेत्र ठरत आहे. त्यामुळे सुरक्षीततेच्या दृष्टीने बांधकाम विभागाने घाटाच्या रूंदीकरणासह आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा दुर्दैवी  घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार ?