Thu, May 28, 2020 12:14होमपेज › Satara › सातार्‍याचा निकाल पाचच्या आत

सातार्‍याचा निकाल पाचच्या आत

Published On: May 16 2019 2:13AM | Last Updated: May 15 2019 11:41PM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभा मतदारसंघाची दि. 23 मे रोजी मतमोजणी होत असून  सायंकाळी 5 वाजपेर्यंत अंतिम निकाल लागण्याची शक्यता असली तरी दुपारपर्यंत कल दिसून येण्याची शक्यता  आहे. ‘ईटीपीबीएस’ची क्यूआर कोड तपासणीची प्रक्रिया, वाढलेले पोस्टल व्होटर्स तसेच ‘व्हीव्हीपॅट’वरील चिठ्ठ्यांची करावी लागणारी मोजणी या प्रमुख कारणांमुळे  यावर्षी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास विलंब होणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्या महिन्यात निवडणूक झाल्याने जिल्हावासीयांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. मतमोजणीस फक्‍त सातच दिवसांचा कालावधी उरला असल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. मतमोजणी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बुधवारी सकाळी बैठक पार पडली. मतमोजणी प्रक्रियेच्या कामांना वेग आला आहे. सरकारी कर्मचारी आणि मतदारसंघाच्या बाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान, निवडणूक काळात राज्याबाहेर असलेले सशस्त्र पोलिस दलांमधील जवान, जवानांच्या पत्नी, परदेशात सेवा बजावत असलेले सरकारी अधिकारी आणि कर्मचारी ‘ईटीपीबीएस’ पध्दतीने मतदान करु शकतात. ‘ईटीपीबीएस’ तसेच पोस्टल व्होटर्सचे मतदान  सकाळी 7 वाजून 59 मिनिटांपर्यंत स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.  इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस), पोस्टल व्होटर्स तसेच व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) वरील मते मोजल्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मतमोजणीवेळी  उभारलेल्या स्वतंत्र कक्षात ‘ईटीपीबीएस’ तसेच पोस्टल व्होटर्सच्या मतांची मतमोजणी होणार आहे. ‘ईटीपीबीएस’च्या मतांची क्यूआर कोडची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला सुमारे एक-दोन तासांचा अवधी लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.  या मतमोजणीनंतर सहा विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनवरील मतांची मतमोजणी होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय फेर्‍या होणार आहेत. 

मतमोजणीवेळी कराव्या लागणार्‍या तांत्रिक पूर्तता विचारात घेता अधिकृत निकाल जाहीर होण्यास 10 ते 12 तासांचा कालावधी लागू शकतो. सातारा मतदारसंघातील मतदारांची वाढलेली संख्या व त्यामुळे मतदान केंद्रांमध्ये 40 ने झालेली वाढ, ‘ईटीपीबीएस’ तसेच पोस्टल व्होटरर्सची वाढलेली संख्या, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांधमील ‘व्हीव्हीपॅट’ चिठ्ठ्यांची करावी लागणारी मोजणी या प्रमुख कारणांमुळे यावर्षी लोकसभा निवडणुकीचा निकाल उशिरा म्हणजे सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत लागणार आहे.  तरीही प्रशासनाने निवडणुकीचा निकाल वेळेत लागावा यासाठी आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. मतमोजणी कामी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचार्‍यांऐवजी इतर ठिकाणचे कर्मचारी घेण्यात आले आहेत.

मतमोजणीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची मोठी खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. मतमोजणी सुरू असताना त्याचा निकाल इलेक्ट्रॉनिक डिस्प्‍ले बोर्डवर तसेच गोडावून बाहेर लावण्यात येणार्‍या स्पीकरवरुनही जाहीर केला जाणार आहे. निकालाची माहिती निवडणूक आयोगालाही त्वरित कळवली जाणार आहे.

सातारा व वाई मतदारसंघांत सर्वाधिक फेर्‍या

सातारा-जावली तसेच वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर विधानसभा मतदारसंघांत मतमोजणीच्या सर्वाधिक 23 फेर्‍या होणार असून कराड दक्षिणमध्ये मतमोजणीच्या सर्वात कमी 16 फेर्‍या होणार आहेत. ‘ईटीपीबीएस’ व टपाली मतदान आणि मतमोजणीच्या फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच याप्रमाणे 30 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे. सोडत पद्धतीने या केंद्रांची निवड केली जाणार आहे.  ही मतमोजणी झाल्यानंतर मतदारसंघाचा 4-5 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.