Sun, Mar 24, 2019 06:36होमपेज › Satara › पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:04PMसातारा : विशाल गुजर

जिल्ह्यात ठोसेघर, महाबळेश्वर, पाचगणी, कोयना या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांचा समावेश असताना अलीकडच्या काळात नवनवी पर्यटनस्थळे उदयास आली आहेत. या पर्यटनस्थळावर निसर्गप्रेमी व पर्यटकांची सुट्टीच्या कालावधीत तोबा गर्दी होत असते. अनेकदा हुल्लडबाजांमुळे अप्रिय घटना घडू लागल्या आहेत. शनिवारी सज्जनगडावरून पडून एका युवकाला प्राण गमवावे लागले. अशा अनेक घटना पर्यटनस्थळी घडू लागल्याने तेथील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा नव्याने ऐरणीवर आला आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग संततधार पाऊस झाल्याने निसर्ग सौंदर्याने नटलेला असून या पर्यटनस्थळांसह विविध अध्यात्मिक ठिकाणांकडे जिल्ह्यासह, राज्यातील पर्यटकांचा, भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ठोसेघर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई यापाठोपाठ आता कास, बामणोली, कोयनानगर, अजिंक्यतारा, मेणवली, भांबवली, केळवली, सांडवली, सडा वाघापूर, उरमोडी धरण, कण्हेर धरण यासह विविध प्रकारचे छोटे-मोठे धबधबे, या परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी होऊ लागली आहे.

याशिवाय सज्जनगड, गोंदवले, शिखर-शिंगणापूर, चाफळ, म्हसवड, औध या धार्मिकस्थळी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने येथील सुरक्षिततेचा प्रश्‍न उभा थाटला आहे. शासनाकडून या ठिकाणच्या विकासासाठी विशेष व ठोस प्रयत्न केले जात नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या धबधबा दरीत कोसळून आतापर्यत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याची खबरदारी घेत येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने धबधबा परिसरास रेलिंग करून घेत प्लेव्हर ब्लॉक बसवून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, अनेक हुल्लडबाज पर्यटक या रेलिंग मधून पाणी पातळीत उतरण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या प्रत्येक पर्यटनस्थलाकडे तरुणवर्ग एन्जॉय म्हणून पाहत आहे. मग ते धार्मिक स्थळ असले तरीही.

काही दिवसांपूर्वीच सातारा येथील 6 जणांच्या टोळीने ठोसेघर येथे  मद्यप्राशन करून धबधबा परिसरात राडा केला. अश्‍लिल शिवीगाळ, ओरडणे आणि मारहाण करण्यासारखे प्रकार केले. यावर समितीच्या कर्मचार्‍यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ही उलटसुलट उत्तरे देण्यात आली. यावर एका व्यक्तीने पीसीआरला त्यांच्या गाडीचे नंबर व्हाट्सअप केले त्यावर पोलीस कर्मचारी यांनी त्यांच्यावर कारवाई केली.  त्याचबरोबर चारकाकी वाहनातून आलेल्या 5 मद्यप्राशन केलेल्या पर्यटकांनी तर उरमोडी धरणाची पाणी पातळीत वाढ झाली असतानाही पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. एवढ्यातच न थांबता महिला पर्यटकांना खुनावण्याचा प्रयत्नही काही दिवसांपूर्वी झाला होता. उरमोडी धरण परिसरात रेन डान्स करीत पाण्यात नाचण्यासही आले. या परिसरात पर्यटकांना ओघ वाढत असून यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे. गतवर्षी काही पर्यटकांनी परिसरातील जनावरे चारण्यास येणार्‍या अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. यावर त्यांना चोपही पडला होता.अशा अनेक अप्रिय घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे ही पर्यटनस्थळे बदनाम होवू लागली आहेत.

जिल्ह्यात पर्यटन वाढू लागल्याने रोजगार निर्मितीत वाढ होऊन नवी इंडस्ट्री उभी राहण्याची शक्यता आहे. या पर्यटणस्थळावर मराठी, हिंदी चित्रपटासह मालिकांचे चित्रीकरण होत असल्याने या परिसराची सॉलिवूड म्हणून नवी ओळख होत आहे.

कायमस्वरूपी पोलिस असावेत...

पावसाळा सुरू झाला की सातारा तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने कास रोडवर यवतेश्वर जवळ, कण्हेर धरण परिसर तर ठोसेघर रस्त्यावर ज्ञानश्री कॉलेज येथे चेक पोस्ट फक्त शनिवार, रविवार या दोनच दिवशी असतात. तर धबधबा परिसरात दोन पोलिस असतात मात्र, इतर दिवशी मद्यप्राशन करून हुल्लडबाज राडा करतात. त्यामुळे कायमस्वरूपी एकतरी पोलीस कर्मचारी सुरक्षेच्यादृष्टीने याठिकाणी असावा. अशी मागणी पर्यटकासह, स्थानिकांमधून होत आहे.

पर्यटन स्थळांवर काचांचा ढीग...

हुल्लडबाज एकत्र आले की अप्रिय घटना घडलीच म्हणून समजा. कोण मित्र भेटतोय आणि हुल्लडबाजी करतोय हे जणू ब्रीदवाक्यच तयार झाले आहे. सध्या सगळीकडे हिरवागार डोंगर असल्याने अनेक तरुण कॉलेज बुडवून एन्जॉय करण्यासाठी जात आहेत. मात्र, फक्त निसर्गाचा आनंद न लूटता मद्यप्राशन करणे हे एक समीकरणच ठरले आहे. आडोसा किंवा वेगळा पॉईंट दिसला की मद्यप्राशन करायला बसलाच त्यामुळे सर्व पर्यटन स्थळावर मद्याच्या बाटल्यांचा ढीग, सिगारेटची पाकिटे दिसत आहेत.

धार्मिकस्थळी लव्हर्स...

जिल्ह्यातील धार्मिकस्थळी मोजकेच भक्त देवाच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. तर सद्या धार्मिक स्थळाकडे आता लव्हर्सनी मोर्चा वळविला आहे. कारण इतर पर्यटन ठिकाणी गर्दी असते तर धार्मिकस्थळी मोजकेच भक्त येतात त्यामुळे अनेक धार्मिक स्थळी आडोसे गाठुन लव्हर्स बसलेले दिसत आहेत.

उरमोडीवर धिंगाणा....

उरमोडी धरण परिसर आता पर्यटकांना साद घालत आहे. एकीकडे धरणाचे पाणी तर सभोवती हिरवागार डोंगर त्यामुळे पर्यटकांसह मद्यपी याठिकाणी सकाळपासून रात्री पर्यंत ठिय्या मांडलेलेच आहेत. याठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने मद्यप्राशन करून धिंगाणा घालताना दिसत आहेत. दुसरीकडे लव्हर्सही याठिकाणी असल्याने हा लव्हर्स पॉईंट बनत चालला आहे.