Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Satara › प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:18PMसातारा : विशाल गुजर

पोलादपूर घाटात शनिवारी सकाळी झालेल्या भयावह अपघाताने खाजगी वाहतुकीचा अन् त्याअनुषंगाने खासगी बसमधील असुरक्षित प्रवासाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मिनी बस व ट्रॅव्हल्स कंपन्यांचे व्यवस्थापन, त्यांचे चालक यांच्याकडून प्रवाशांची खरोखरच काळजी घेतली जाते का? हाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

शनिवारी सकाळी पोलादपूर घाटात दापोली येथील कृषि विद्यापिठातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात तब्बल 30 जण ठार झाल्याने अनेकांच्या अंगाचा थरकापच उडाला. खासगी बसचा प्रवास खरोखरच सुरक्षित आहे का? हे पाहणेही आता क्रमप्राप्त बनले आहे. या अपघातामुळे मिनी बसने प्रवास करणार्‍या नागरिकांच्या अंगावर काटा आला आहे. या घटनेवरून मिनी बस व ट्रॅव्हल्स एजन्सी प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत किती सतर्क आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. खासगी वाहतूक करणार्‍या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियम घालून दिले आहे. पण, या नियमांची तमा न बाळगता फक्‍त पैसा पैसा करत कंपन्या नागरिकांच्या जिवांशी खेळत आहेत. पनवेलजवळ दि. 5 जून 2016 रोजी झालेल्या अपघातावेळीही त्याची प्रचिती आली होती. त्यावेळी ट्रॅव्हल्स अपघातात 17 जण ठार तर 14 जण जखमी झाले होते. हे सर्वजण सातारा जिल्ह्यातील होते. 

खाजगी वाहनांच्या वाढत्या अपघातांमुळे त्यांच्याकडील प्रवासी संख्या रोडावल्याचे चित्र आहे. अनेकदा अपघाताबाबतची कोणतीही माहिती ट्रॅव्हल्स कार्यालयात नसते. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे दिसते. या ट्रॅव्हल्स एजन्सींकडून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून फक्‍त व्यवसाय करण्यावर भर दिला जात आहे. सर्वच ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची सुरक्षितता वार्‍यावर सोडण्यात आल्याने प्रशासनाकडून या कंपन्यांची झाडाझडती घेण्याची वेळ आली आहे. गाड्यांबाबतचे कोणतेच रजिस्टर अद्यायवत नसल्याने अपघातावेळी नातेवाईकांची गोची होते. प्रवास करणारे सर्वच प्रवासी हे ऐन वेळेला येत नाहीत. 

गाडीमधील सुमारे 85 टक्के जागा या आरक्षित असतात. त्यामुळे या तरी प्रवाशांची माहिती उपलब्ध असणे आवश्यक होते. मात्र, अनेकदा नियमांना तिलांजली दिली जावून प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे दिसत आहे. 

फिरायला जाताय... काळजी घ्या

सातारा जिल्ह्यात असलेल्या विविध मिनी बस, ट्रॅव्हल्स व प्रवासी वाहतूक करणारी वाहने व त्यांच्या कंपन्यांच्या वाहनांची तपासणी  दरवर्षी आरटीओ कार्यालयामार्फत करण्यात येते. मात्र, पोलादपूर घाटात झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा अशा वाहनांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड,  कोरेगाव, वाई, महाबळेश्‍वर, फलटण येथून बहुतांश प्रमाणात पुणे - मुंबई व अन्य ठिकाणी दररोज ट्रॅव्हल्ससह विविध वाहनांमधून प्रवासी वाहतूक केली जाते. सध्या पावसाळी दिवस असून पर्यटनालाही अनुकूल वातावरण असल्याने सहलींचे प्रमाण वाढले आहे. कुटुंब व मित्र परिवारासह भटकंती करायला जाणार्‍यांची संख्या सध्या लक्षणीय आहे. संबंधितांनी या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या वाहनांबाबत काळजी घेणेही गरजेचे आहे.  संबंधित वाहन रस्त्यावर सुरक्षित धावण्याइतपत सुरक्षित आहे का? त्याचा चालक तरबेज अन् अनुभवी आहे का? हे पाहणेही महत्वाचे आहे. त्याचबरोबर वाहनाच्या कागदपत्रांचीही पडताळणी करणे क्रमप्राप्त आहे.