Tue, Jul 23, 2019 07:03होमपेज › Satara › मंडईचे भिजत घोंगडे !

मंडईचे भिजत घोंगडे !

Published On: Mar 26 2018 1:33AM | Last Updated: Mar 25 2018 11:04PMकराड : अमोल चव्हाण

मलकापूर भाजी मंडईचा प्रश्‍न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला आहे. शेतकरी संघटनेसह आंदोलन करणारे व आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांसह त्याला विरोध करून शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍यांनी हा प्रश्‍न प्रतिष्ठेचा केल्याने मंडईत भाजी विकणार्‍या शेतकर्‍यांचा मुळ प्रश्‍न बाजूलाच पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंडईचे भिजत घोंगडे कायम असून शेतकर्‍यांची फरफट थांबता थांबत नाही.     

सुमारे चौदा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत असताना कराडलगतचे विकसीत होणारे गाव म्हणून तालुक्यातील शेतकरी मलकापूरमध्ये आपल्या  शेतात पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी आणू लागले. दररोज ताजा भाजीपाला मलकापुरात विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळताच ग्राहकांचा तिकडे ओढा वाढला. त्यामुळे मागणी वाढल्याने तालुक्यातील छोटे-मोठे शेतकरीही मलकापूरमध्ये येऊन आपल्या भाजीपाल्याची विक्री करू लागले. ही बाब काही व्यापार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी मलकापूरमध्ये भाजीपाला घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांकडून तो विकत घेऊन स्वत:  शेतकरी म्हणून विक्रीसाठी बसू लागले. परंतु, काही शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना भाजीपाला न देता स्वत:चा माल स्वत: विक्री करणे सुरुच ठेवले. 

दरम्यानच्या कालावधीत मलकापूरमध्ये खासगी जागेत भरणार्‍या या मंडईची उलाढाल चांगलीच वाढली. येथे भाजीपाला विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना दररोज ताजा पैसा मिळू लागला. तर शेतकर्‍यांकडून शेतीमाल घेऊन मंडईत विक्री करणार्‍या व्यापार्‍यांनाही चांगले दिवस आले. त्यामुळे काही दिवसात ताज्या शेतीमालाची मंडई म्हणून मलकापूरच्या मंडईची ओळख निर्माण झाली. मलकापूरचा विस्तार होत असताना तसेच ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले असताना नागरी वस्तीमध्येही झपाट्याने वाढ होऊ लागली. त्याचबरोबर येथील मंडईचा ग्राहकही वाढला. 

शेतकर्‍यांची मंडई अशी ओळख निर्माण झालेल्या या मंडईमध्ये हळूहळू व्यापार्‍यांचा राबता वाढला. त्यातून शेतकरी व व्यापारी यांच्यात कुरबूर होऊ लागली. मात्र, मंडई खासगी जागेत भरत असल्याने खासगी मालकापुढे कोणचीही टाळ शिजली नाही. खासगी मालक प्रत्येक शेतकरी व व्यापार्‍याकडून पैसे घेऊन त्याला बसण्यास जागा देत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यातून प्रत्येकाने आपली जागा नक्की केली होती. त्यामध्ये व्यापारी आघाडीवर होते. शेतकरी ज्या ठिकाणी जागा मिळेल तेथे बसून भाजीपाला विकत होते. येथे येणार्‍यांना तेवढ्या प्रमाणात सोयी-सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुनील कोळी यांनी सुमारे महिनाभरापूर्वी खासगी जागेतील भाजीमंडई बंद करावी म्हणून उपोषण सुरु केले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी संबंधित जागा मालकाला बोलावून मंडई बंद करण्याचे आदेश दिले व त्याच जागेलगतच्या रस्त्यावर व नगरपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यांवर अशा दोन ठिकाणी भाजीमंडईसाठी जागा दिल्या होत्या. मात्र नगरपंचायत समोरील जागेवर कोणीही शेतकरी अथवा व्यापारी भाजी विक्रीसाठी फिरकले नाही.

तर मंडईसमोरच्या रस्त्यांवरच भाजीमंडई भरू लागली. ती जागा अपुरी असल्याने वाहतूकीची कोंडी होऊ लागली. रस्त्यावर मंडई आल्याने शेतकर्‍यांच्या अडचणींमध्ये भरच पडली. रिक्षाचालक, शेतकरी व भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमधेही वादाच्या घटना घडू लागल्या.शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे नुकसान होऊ लागले. त्यामुळे पुर्वीच्या जागेतच भाजीमंडईसाठी जागा द्या अशी मागणी करत काही शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर मोर्चा काढला.

यावेळी नगरपंचायतीचे पदाधिकारी व अधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत जागामालकाबरोबर चर्चा करून व कायदेशीर बाबींची पूर्तता करून तोडगा काढण्याचे आश्‍वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर पुन्हा खासगी जागेत मांडई भरण्याचे संकेत मिळू लागल्याने पुन्हा काही लोकांनी नगरपंचायतीला निवेदन देऊन खासगी जागेत मंडई न भरविण्याची विनंती केली. मंडई हलविण्यासाठी प्रयत्न करणारे व त्याच खासगी जागेवर मंडई भरावी म्हणून प्रयत्न करणार्‍यांनी हा प्रश्‍न प्रतिष्ठेचा केल्याने मंडईच्या जागेचे भिजत घोंगडे कायम असून शेतकर्‍यांची फरफट होत आहे. 

 

Tags : satara, karad news, Malkapur Bhaji Mandai,