Tue, Jul 23, 2019 01:58होमपेज › Satara › आमदार जयकुमार गोरे हिवाळी अधिवेशनात सरकारवर बरसले 

समृध्दी महामार्ग, बुलेट ट्रेन म्हणजे विकास नव्हे 

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 10:56PM

बुकमार्क करा

खटाव :  प्रतिनिधी 

शेतीचे उत्पादन दुपटीने वाढवून शेतीमालाला अधिक भाव देऊन शेतकर्‍यांना सक्षम करण्याची घोषणा करणार्‍या भाजपा सरकारने गेल्या तीन वर्षात काडिचेही काम केले नाही. उलट पिक कर्ज, शेती पंपाला वीज, दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पांना निधी न दिल्याने शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्यात सरकारने धन्यता मानल्याचा  घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात केला. दरम्यान एक समृद्धी महामार्ग आणि एक बुलेट ट्रेेन म्हणजे विकास नव्हे, असेही त्यांनी सरकारला ठणकावले.

आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, भाजपा सरकारने सत्तेवर येताना जनतेला आणि खास करुन शेतकर्‍यांना अनेक अश्‍वासने दिली होती. आता तीन वर्षे झाली तरी हे सरकार काहीही करु शकले नाही. अधिवेशनात हे सरकार कर्जमाफी, शेतीमालाच्या उत्पन्नवाढीबद्दल काही बोलत नाही. संबंधीत मंत्री फक्त पश्‍चिम महाराष्ट्राचा द्वेष करण्यात वेळ घालवित आहेत. आघाडीच्या काळात राज्यावर पावणेतीन लाख कोटींचे कर्ज होते. गेल्या तीन वर्षात या सरकारने ते साडेचार लाख कोटींवर नेले तरी विदर्भाचा बॅकलॉग भरुन निघाला नाही. शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी कर्जमाफी न देता त्यांचे शेती उत्पन्न दुप्पट करणे, शेतीला पुरेशी वीज आणि पाणी देण्याची सरकारची घोषणा हवेत विरली आहे. 

सातारा जिल्ह्यात आघाडी सरकारच्या 2015-16 या   काळात एका वर्षात 3000 कृषी पंपांना वीजजोड दिले गेले होते. या सरकारने चालू वर्षात फक्त 500 वीजजोड दिले आहेत. शेतकर्‍यांना तीन तीन वर्षे पैसे भरुन कनेक्शन दिले जात नाही. हे सरकार विदर्भातील बॅकलॉगच्या नावाखाली पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. विदर्भातील साखर कारखाने, सुतगिरण्या का चालत नाहीत? याचा विचार होत नाही. तिथे कापूस सर्वाधिक मात्र सुतगिरण्या आमच्या भागातील का चालतात? याचा सरकारने अभ्यास करावा, असेही आ. गोरे म्हणाले. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील माण, खटाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर आणि जत या दुष्काळी पट्ट्यात सिंचन सुविधा देण्यासाठी तीन वर्षात या सरकारने काहीही केले नाही.  मुख्यमंत्री आणि विविध मंत्री हे अखंड महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र असा दुजाभाव करु नये. अनुशेष अनुशेष म्हणता मग विदर्भात तरी तुम्ही काय दिवे लावलेत ते एकदा पहा. तिकडेही  सिंचन क्षेत्रात वाढ नाही, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत, दुग्ध व्यवसायात वाढ नाही. मग तुम्ही तिकडे केले तरी काय? असा सवाल त्यांनी केला.