Thu, Jul 18, 2019 17:23होमपेज › Satara › धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न सुटेल : श्‍वेता सिंघल

धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न सुटेल : श्‍वेता सिंघल

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 9:57PMसातारा / कुडाळ : प्रतिनिधी

महू-हातगेघर धरणग्रस्तातील ज्यांना जमिनी मिळाल्या नाहीत, त्यांनी तत्काळ उपलब्ध असलेल्या जमिनी पसंतीने निवडाव्यात. ज्यांना अर्धवट जमिनी वाटप झाल्या आहेत त्यांना जमिनी दिल्या जातील. बाकी  धरणग्रस्तांच्या इतर अडचणी सोडविण्यास प्राधान्य राहील. प्रत्येक धरणग्रस्तांच्या वैयक्‍तिक प्रकरणावर प्रशासन लक्ष देत आहे. येत्या काही दिवसांत येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न सुटलेला असेल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल यांनी दिले. 

महू-हातगेघर धरणग्रस्तांच्या उपोषणस्थळी जिल्हाधिकार्‍यांनी भेट देवून त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेवून त्यांचे उपोषण सोडविले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आ. शिवेेंद्रराजे भोसले, जि.प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, अस्मिता मोरे, संतोष जाधव, तहसीलदार रोहिणी आखाडे आदी उपस्थित होते.

महू-हातगेघर धरणग्रस्तांचे बहुतांशी प्रश्‍न संपलेले आहेत. ज्यांना जमिनीचे वाटप झाले नाही त्यांच्या जमिनी वाटप करुन दिल्या जातील. ज्या धरणग्रस्तांना जमिनी वाटप झाल्या आहेत, मात्र मूळ मालक ताबा देत नाही किंवा वहिवाट देत नाही त्यांच्यावर कारवाई करून दंड लावण्यात यावा, अशा सूचना यावेळी सिंघल यांनी दिल्या.

महू-हातगेघर धरणात 1 हजार 218 बाधित शेतकरी असून यामधील फक्‍त 98 खातेदार शिल्‍लक राहिले आहेत. यामधील 68 प्रकल्पग्रस्त खातेदारांना नियोजन बदलानुसार फलटण तालुक्यातील शिल्‍लक असलेल्या जमिनी पसंत नसल्याने प्रलंबित आहेत. त्यातील 30 खातेदारांच्या जमिनी मागणी अर्जानुसार जमिन वाटपाचे काम प्रगती पथावर आहे. कावडी गाव हे 100 टक्के बाधित असून त्यांच्या जमिनी वाटप, वहिवाट, गावठाण हे प्रश्‍न सोडवण्यास प्रशासन सकारात्मक आहे.

दरम्यान, धरणग्रस्तांच्या उपोषणस्थळी येवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून त्या मार्गी लावणार्‍या श्‍वेता सिंघल या पहिल्या जिल्हाधिकारी असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले  यांनी सांगितले. या सकारात्मक भूमिकेची दखल घेवून धरणग्रस्तांनी सिंघल यांना साडी चोळीची भेट देऊन  त्यांचा सत्कार केला.