Wed, Jul 24, 2019 14:16होमपेज › Satara › घनकचरा प्रकल्पाच्या कामाचा गौरव

पाचगणी पालिकेचा दिल्ली दरबारी झेंडा

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:19PM

बुकमार्क करा

भिलार : वार्ताहर

नगरपालिकांचे घनकचरा व्यवस्थापन आणि त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती या आव्हानात्मक कामात पाचगणी पालिकेने देशात नावलौकिक मिळविला आहे. या यशाची दखल दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अ‍ॅन्ड एन्व्हायरमेंट या संस्थेने घेतली. दिल्लीत आयोजित परिषदेत प्रतिनिधित्व करण्यासाठी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर यांना निमंत्रित केले गेले. देशातील निवडक 20 शहरांच्या परिषदेत पाचगणीचा समावेश झाल्याने पालिकेचा झेंडा दिल्ली दरबारी लागला आहे.

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅन्ड एन्व्हायरमेंट या संस्थेने देशातील कचरा व्यवस्थापनात लक्षवेधी काम करणार्‍या 20 शहरांचा मंच स्थापन केला आहे. त्यामध्ये नगराध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले. देशात नागरी स्वच्छता व घनकचर्‍याचे व्यवस्थापन यामध्ये रोल मॉडेल ठरलेल्या पाचगणी पालिकेचा समावेश आहे. सौ. कर्‍हाडकर यांनी घनकचर्‍यापासून सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्पाचे सादरीकरण केले. पाचगणी पालिकेचे नेतृत्व करताना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले.

पाचगणी पालिकेने मागील दोन वर्षांपासून शहरात दररोज निर्माण होणारा 5 टन ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचा सेंद्रीय खत निर्मितीसाठी विनियोग करण्यास सुरूवात केली. या प्रकल्पातून खत निर्मिती होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यास मदत होण्याबरोबरच पर्यटनात वाढ झाली आहे. पालिकेने तयार केलेले सेंद्रीय खत  शेतकर्‍यांना 5 रुपये किलो या अत्यल्प दराने पुरवण्यात येत आहे. तसेच प्लॅस्टिक व पुनर्वापर होऊ शकणारा कचरा संबंधित कंपन्यांना पाठवून देण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेला उत्पन्न व शहर स्वच्छ राहण्यास मदत होत असल्याचे सौ. कर्‍हाड यांनी परिषदेत स्पष्ट केले. घनकचरा व्यवस्थापनातील कामांची दखल पर्यावरण विषयक राष्ट्रीय संस्थेने घेतली गेल्याने पाचगणीकरांची मान अभिमानाने उंच झाली आहे.