Fri, May 29, 2020 19:42होमपेज › Satara › पंतप्रधान फडणवीसांना राजधर्म पाळायला सांगणार का? : पृथ्वीराज चव्हाण

एकाच पक्षाची सत्ता म्हणजे हुकुमशाही : पृथ्वीराज चव्हाण

Published On: Oct 01 2019 8:47PM | Last Updated: Oct 01 2019 8:47PM
कराड : प्रतिनिधी

फोडाफोडीचे राजकारण करून, धमकावून विरोधी पक्ष संपवणे म्हणजेच एका पक्षाची सत्ता येणे, एका पक्षाची सत्ता म्हणजेच एका व्यक्तीची सत्ता येणे आणि एका व्यक्तीची सत्ता येणे म्हणजे हुकुमशाही आणि भाजपला ही हुकुमशाही देशभर आणायची आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केला.

कराड दक्षिण मतदारसंघातून उभे राहण्यासंदर्भात घोषणा करण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणूकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना गंभीर माहिती लपवली होती. या बाबत प्रलंबित असलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. देवेंद्र फडवणीस यांच्याविरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांनी ही माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नाही. फक्त एकवीस गुन्हे आहेत एवढेच मान्य केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आणि लपवलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये किमान दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. दोन वर्षे शिक्षा असणारे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे लपवणे हा एक गंभीर अपराध आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 125 प्रमाणे हा गुन्हा सिद्ध झाला तर तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांनी ही गंभीर माहिती लापवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ याबाबत गुन्हा नोंदवावा अशा सूचना दिली आहे. हे प्रकरण गंभीर असून जनता आणि न्यायालयाला फसवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे नैतिकतेचे आणि कायद्याचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. देवेंद्र फडवणीस यांच्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मला एक विनंती करायची आहे. पारदर्शक प्रशासनाची आपण लोकांना हमी देता, या  प्रकरणामध्ये आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राजधर्म पाळावा असा आदेश देणार का? याची महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत आहे.

येणारी निवडणूक आम्ही जनतेच्या  पोटापाण्याच्या प्रश्नासाठी लढवणार आहे. आज देशात सर्वत्र मंदीची लाट आहे. गेल्या सहा वर्षात सर्वात कमी विकासदर नोंदवला गेला आहे. यामुळे विकास कमी होत चालला आहे, बेरोजगारी वाढत आहे. सुरुवातीला मोदी सरकारने बेरोजगारी व मंदीचे आकडे स्वीकारले नाहीत मात्र केंद्र सरकारच्या एका संस्थेने ही आकडेवारी दिलेली आहे. बेरोजगारी, आर्थिक मंदी,  शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पूर परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश या विषयावर आम्ही निवडणूक लढणार आहोत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.