Thu, Aug 22, 2019 14:34होमपेज › Satara › पाणी वापरावर निर्बंध आवश्यक

पाणी वापरावर निर्बंध आवश्यक

Published On: May 16 2019 2:13AM | Last Updated: May 16 2019 2:13AM
पाटण : गणेशचंद्र पिसाळ

चालू वर्षी जून महिना कोरडा जाण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील पाण्याचे भवितव्य ठरविणार्‍या कोयना धरणाबाबत चिंता वाढली आहे. धरणाचे तांत्रिक वर्ष संपण्यासाठी केवळ पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्याचवेळी धरणातील पाणीसाठा, विजेसाठीचा आरक्षित पाणी कोटा व सध्या सिंचनासाठी सोडण्यात येणारे महाकाय पाणी, हे सत्र असेच सुरू राहिले तर मात्र जूनच्या पहिल्याच आठवड्यात येथे पाण्याचा ठणठणाट होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. 

त्यामुळे हवामान खात्याचे अंदाज, संभाव्य परिस्थिती व उपलब्ध पाणीसाठा याचे काटेकोर नियोजन व निर्बंध आता अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे मत जलतज्ञांकडून व्यक्त होत आहे. 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 28.06 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 1 जून ते 31 मे या तांत्रिक वर्षापैकी केवळ पंधरा दिवस शिल्लक असले तरी जून महिन्यात सुरू होणार्‍या पावसापर्यंत हे पाणी पुरविण्याचे मोठे आव्हान आहे. 

सध्या पूर्वेकडे सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. यात कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून पाणी सोडणे सुरूच असतानाही दुष्काळी भागातून मागणी वाढत चालल्याने गेल्या अनेक दिवसांपासून धरणाच्या भिंतीच्या खाली असणार्‍या रिव्हर्स दरवाजातून सातत्याने पाणी सोडावे लागत आहे. यातून वीज निर्मितीही होत नाही. आत्तापर्यंत सिंचनासाठी 31.75, पुरकाळात 8.45 तर रिव्हर्स दरवाजातून 3.48 असे एकूण 43.68 टीएमसी पाणी पूर्वेकडे सोडण्यात आले आहे. यापैकी 40.20 टीएमसी पाण्यावर 185.290 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे. गतवर्षी अखेरच्या टप्प्यात रिव्हर्स दरवाजातून पाणी सोडण्यात आले होते. परंतु यावर्षी ते लवकर सोडण्यात आल्याने  धरण निर्मितीनंतर सिंचनासाठी ऐतिहासिक पाणीवापर यावर्षी होणार हेही आता निश्‍चित आहे. 

पश्‍चिमेकडील तीन जलविद्युत प्रकल्पांसाठी वर्षभरात 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते.  त्यापैकी आत्तापर्यंत 55.32 टीएमसीचा वापर होवून यातून 2499.459 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. या आरक्षित कोठ्यापैकी अद्याप 12.18 टीएमसी पाणी शिल्लक आहे. सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार केला तर एकूण 28.06 टीएमसी पाणी शिल्लक आहे. यापैकी पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठीचा आरक्षित 12.18, मृतसाठा 5 असा एकूण 17.18 टीएमसी पाण्यानंतर धरणात केवळ 10.88 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. सध्याचा सिंचनासाठीचा पाणी वापर असाच सुरू राहिला तर दहा ते पंधरा दिवसातच हा पाणीसाठा संपुष्टात येऊ  शकतो. त्यामुळे निश्‍चितच यावर्षी वीज निर्मितीच्या आरक्षित कोठ्याला कात्री लावून ते पाणी सिंचनासाठी वापरण्याशिवाय प्रशासनाकडे अन्य पर्यायच राहणार नाही. याशिवाय मृतसाठा व गेल्या अनेक वर्षापासून धरणात साठलेल्या गाळाचाही विचार आता क्रमप्राप्त झाला आहे. 

हा मे अखेरचा विचार असून यंदा स्कायमेट अथवा अन्य हवामान खात्यांच्या अंदाजानुसार खरोखरच जून महिना कोरडा गेला तर निश्‍चितच या पाण्याची भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सध्याचा पाणीसाठा व त्याचा सुरू असलेला वापर यावर निर्बंध लावणे, यासाठी नियोजनात्मक प्रतिबंध करणे हे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे.