Sun, Apr 21, 2019 05:47होमपेज › Satara › वाई नगराध्यक्षांवर अपात्रतेची टांगती तलवार

वाई नगराध्यक्षांवर अपात्रतेची टांगती तलवार

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 10:58PMवाई : प्रतिनिधी

वाईच्या नगराध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे यांनी शौचालयाच्या बांधकामाचे 1 लाख 40 हजार रूपयांचे बिल काढण्याच्या बदल्यात 14 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सौ. प्रतिभा शिंदे व पती सुधीर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात झाला होता. यामुळे नियमांचा भंग झाल्यामुळे त्यांना नगराध्यक्ष पदावरून दूर करून पुढील 6 वर्षाच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास किंवा इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अपात्र का करण्यात येऊ नये, अशी कारणे  दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

शौचालयाचे बिल काढण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी नगराध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. यामुळे महाराष्ट्र अधिनियम 1965 च्या कलमांचे उल्लंघन होते. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. यासाठी सौ. शिंदे यांना लेखी खुलासा करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सदर खुलासा दिलेल्या मुदतीत न दिल्यास याबाबतीत त्यांना काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहित धरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

वाई नगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षापदाची निवड थेट जनतेतून झाली होती. यात अटीतटीची निवडणूक होऊन महाआघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. प्रतिभा शिंदे यांनी केवळ 1 मत जास्त मिळवून तीर्थक्षेत्र आघाडीच्या उमेदवार शोभा रोकडे यांचा पराभव केला होता. सुशिक्षित उमेदवाराला वाईकरांनी कौल दिला अशी भावना त्यावेळी सर्वत्र व्यक्त झाली होती. मात्र, नगराध्यक्षा पदावर आरुढ होऊन काही महिने झाले असताना डॉ. प्रतिभा शिंदे या लाचखोरी प्रकरणात अडकल्याने सर्वत्र आश्‍चर्य व संताप व्यक्त झाला होता. कायद्यानुसार नगराध्यक्षा या लोकसेवक आहेत. असा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर अभियोग दाखल करण्यास शासनाने यापूर्वीच मंजूरी दिली आहे. त्यामुळे सौ. शिंदे यांचे नगराध्यक्ष पद जाणा का? यावर चर्चांना उधाण आले आहे.