Fri, Mar 22, 2019 01:28
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ‘सर्जा-राजा’चे अस्तित्व आले धोक्यात

‘सर्जा-राजा’चे अस्तित्व आले धोक्यात

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 8:27PMसातारा : प्रतिनिधी

कृषी प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारतात शेतीला महत्त्व आहे. मात्र, बेभरवशाच्या पावसामुळे बळीराजाने गुडघे टेकल्याचे दिसत आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक शेती नावारुपाला आली. शेती क्षेत्राला नवनवीन यांत्रिक साधन सामुग्रीचा वापर होत असताना पारंपरिक औजार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सर्जा-राजाच्या खिलारी जोडीचे अस्तित्व धोक्यात असताना त्यांच्या जोडीला असणारा नांगरही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

भल्या पहाटे डोक्यावर पारंपरिक नांगर, खांद्यावर घोंगडी, पुढे सर्जा - राजाची जोडी हाकत शेताच्या दिशेने पावले टाकणारा बळीराजा सध्या शेतात उभा राहून आधुनिक यंत्राद्वारे होणारी नांगरणी पहात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतामध्ये नांगरणीसाठी राबराब राबणारी सर्जा-राजाची जोडी हाकताना शेतकर्‍यांच्या मुखातून घुमणारा आवाज दमला असून अत्याधुनिक यंत्राचा आवाज शिवारात घुमत आहे. ग्रामीण व खेड्यापाड्यातील सर्रास शेतकर्‍यांनी शेतीसाठी आधुनिक साधनाचा वापर करण्यास सुरुवात केल्याने नांगर फाळ, कुळव, घोंगडी आदि पारंपारिक साधने दिसेनाशी होवू लागली आहेत. बळीराजारने बैलजोड्यांकडे पाठ फिरवल्याने शेतीसाठी वापरला जाणारा नांगरही दुर्मीळ होत चालला आहे. त्यामुळे शेतात नांगर ओढणार्‍या सर्जा राजाच्या जोडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे.

सर्वसामान्य शेतकर्‍यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असून यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येवू लागला आहे. शेतीच्या मशागतीसाठी व श्रमाच्या कामासाठी मंजुरांची कमतरता भासत आहे. 

त्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, जेसीबी विद्युत मोटारीसारख्या उपकरणाचा उपयोग करण्यात येत आहे. शेतातील कामे यांत्रिकीकरणामुळे सोपी व जलद होत असल्याने त्याचा फायदा शेतकर्‍यांना मिळत आहे. कृषि प्रधानदेशात शेतीच्या कामाकडे युवा वर्गाने नाक मुरडल्याने जमीनदार व शेती मालकही शेती करण्याबाबत निरुत्साही बनले आहेत. पारंपारिक शेती व्यवसायात आधुनिक यंत्र सामुग्रींनी केलेली आगेकूच पाहता शेतीतून मिळणार्‍या उत्पन्‍नापेक्षा बळीराजाच्या खिशाला अधिक चाट देणारी आहे. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 

शेतीकडे बघण्याचा उदासीन द‍ृष्टीकोन

शेती मशागतीसाठी होणारा खर्च, रासायनिक खते, कीटकनाशके, जास्त पीक देणारी बी-बियाणे, मजुरांची देणी अशी शेतीच्या खर्चात भरमसाठ वाढ झाली असून त्या बदल्यात मिळणारे उत्पन्‍न आणि हमीभाव याची शाश्‍वती देता येत नाही. शेतीचे झपाट्याने आधुनिकीकरण होत असताना शेती अडचणीत आल्याचा विरोधाभास व्यक्‍त होत असतो. तरुण वर्गाचा शेतीकडे बघण्याचा उदासिन दृष्टीकोन, वाढते शहरीकरण व पारंपारिक शेतीकडे होत आलेले दुर्लक्ष यामुळे शेतीचा पारंपरिक बाज हरवत चालला आहे.