तारळे : वार्ताहर
दर्जाहीन काम असल्याची तक्रार करूनही कोणतीच ठोस कार्यवाही न करण्यात आलेली नाही. तसेच संबंधित कामाचा प्लॅनही दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे प्लॅन दाखवल्याशिवाय कोणत्याही स्थितीत संरक्षक भिंतींचे काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या अनिल माने यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी घेतली आहे. गेल्या महिनाभारापासून तारळे बसस्थानकाच्या संरक्षक भिंतींचेे बांधकाम रेंगाळत चालले आहे. त्यातच या कामात गुणवत्ता नसल्याचे समोर आल्यानंतर ते काम बंद पाडण्यात आले. त्यामूळे गुणवत्तापूर्ण काम असा ढोल वाजवणार्यांना चांगलीच चपराक बसली आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र तोपर्यंत कामात अनेक चुका करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.
संरक्षक भिंतीचे बांधकाम वाळू उपलब्ध होत नसलेने ग्रीडमध्ये सुरु आहे. तीन ते चार फूट खोलीचे खड्डे काढून पिलर उभे करण्यात आले असून यासह बांधकामही ग्रीडमध्ये सुरु आहे. यात सिमेंट किती वापरले हा मुद्दा गौन आहे. भिंत बांधताना भाजीव वीट वापरणे गरजेचे असताना चुकीच्या पद्धतीच्या विटा वापरण्यात आल्याचा आरोप कराण्यात येत आहे. त्यातच कहर म्हणजे ग्रीडमध्ये झालेल्या बांधकामावर पाणी मारण्यात येत नव्हते. बांधकामात एवढा मोठा घोळ होऊनही अधिकारी मात्र कामाकडे दुर्लक्ष करून चुकीच्या कामावर पांघरूण घालत असल्याची शंका उपस्थित होत आहे. यावरूनच संरक्षक भिंतीचे आयुष्यमान किती असेल? याबाबतही तर्कविर्तक उपस्थित केले जात आहेत. कामाबाबत तेथील कामगारांना विचारले असता फक्त पाच फूटाची संरक्षक भिंत होणार असल्याचे सांगत होते. पण त्याव्यतिरीक्त प्लॅनबाबत काही माहितीच नसल्याचे समोर येत आहे. तर झालेल्या निकृष्ट कामाबाबत योग्य भूमिका स्पष्ट न करता नंतरचे कामही त्याच मार्गावर जाणार असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आता अधिकारी ठेकेदाराचे हित बघतात की कामाचा दर्जा ? हे बघावे लागणार आहे.
Tags : Satara, plan, construct, wall, plan, Satara