Fri, Mar 22, 2019 07:41होमपेज › Satara › कृष्णा नदी पुलाच्या पिलरचे दगड सुटले

कृष्णा नदी पुलाच्या पिलरचे दगड सुटले

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 10:28PMकराड: प्रतिनिधी

येथील कृष्णा नदीवरील जुना पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक बनला असून या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी याबाबतचा पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरापूर्वी केला होता. मात्र, पर्यायी मार्ग नसल्याने आणि नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्याने अवजड वाहनांचा धोकादायक प्रवास कृष्णा पुलावरून आजही सुरूच आहे. 

कृष्णा पुलाच्या पिलरचा काही भाग खचला असून दगडही रिकामे झाले आहेत. वर्षभरापूर्वीची ही परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. पिलरच्या बांधकामाचे दगड सुटल्याने ते निकामी होवून कधीही ढासळतील अशी भीती व्यक्त होत आहे. 

वर्षभरापूर्वी तत्कालीन प्रांताधिकारी यांनी कराड- तासगाव मार्गावरील या पुलावरून होणारी अवजड वाहतूक बंद करून ती नव्या पुलावरून वळविण्याच्या सूचना केल्या होत्या. तसा प्रयोग बांधकाम विभागाने करून पाहिला मात्र नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्याने पूर्वीप्रमाणे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले ठेवले. यानंतर बांधकाम विभागाने ना कोणती हालचाल केली ना पुलाची डागडुजी केली.  

सध्या काही पिलरचा खालील भाग काही प्रमाणात खचला आहे. दगडही सुटले आहेत. वरून पिलरच्या काही भागाचे दगड सुटल्याचे दिसत आहे. तर पाण्याखाली पिलरचे कितीप्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व पिलर कितपत सुस्थितीत आहेत याची कसलीच माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (कराड उत्तर) उपलब्ध नाही.   

महाड येथे सावित्री नदीवरील पूल  रात्रीच्या सुमारास कोसळून काही वाहने व प्रवाशांनाही जलसमाधी मिळाली होती. ही घटना घडल्यानंतर सर्व पुलांची पाहणी करून धोकादायक पुलांची माहिती देण्याचे आदेश राज्य सरकारने बांधकाम विभागाला दिले होते. यातून कराडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताच धड घेतल्याचे दिसत नाही. दुर्घटना घडल्यानंतर तत्परता दाखविण्यापेक्षा ती घडण्यापूर्वी संबंधित विभागाने योग्य ती खबदारी घेण्याची गरज आहे, अशी जनभावना असून बांधकाम विभागाने त्या पुलाची पाहणी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.