Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Satara › गुजरातची जनता परिवर्तनाच्या मूडमध्ये

गुजरातची जनता परिवर्तनाच्या मूडमध्ये

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 8:54PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

मोदी सरकारविरोधात गुजरातमध्ये प्रचंड नाराजी आहे. जीएसटी, नोटाबंदी यामुळे अनेक व्यापार बंद पडले आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर पाटीदार समाज नाराज आहे. महिला, बेरोजगार युवक, शेतकरी हा वर्गही सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेला आहे. याचा फायदा काँग्रेसला निश्‍चितच होईल. गुजरातमधील जनता परिवर्तनाचा मूड आहे, असे मत एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवराज मोरे यांनी व्यक्त केले.

शिवराज मोरे यांची सिक्किम, नागालँड, अरुणाचल प्रदेश व पश्‍चिम बंगालच्य प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी मंगळवारी दै.पुढारी कराड विभागीय कार्यालयात येऊन पुढारीकार पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कराड कार्यालय प्रमुख सतीश मोरे यांनी स्वागत केले. यावेळी पुढारी परिवारातील सदस्य उपस्थित होते. 

गुजरात निवडणुकीत दक्षिण गुजरातमधील 12 मतदारसंघांची जबाबदारीही शिवराज मोरे यांच्यावर काँग्रेस पक्षाने सोपविली आहे. गुजरातमधील राजकीय परिस्थितीची माहिती देताना ते म्हणाले, जीएसटी, नोटाबंदी यामुळे अनेक व्यापार बंद पडले आहेत. हिरे, कापड व्यापारी यांच्यामध्ये नाराजी आहे. आरक्षणाच्या मुद्यावर पाटीदार समाज सरकार विरोधात गेला आहे. याचा फायदा काँग्रेसला निश्‍चितच होईल. गुजरातमधील जनतेमध्येच परिवर्तनाचा मूड आहे. पंतप्रधान मोदी यांना 50 सभा स्वत:च्या राज्यात घेण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याना प्रचारसभेसाठी पाचारण करावे लागले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांना घरोघरी जाऊन प्रचार करावा लागला. ही परिस्थिती सरकारविरोधातील असंतोषामुळे नेत्यांवर आली आहे. 

या तुलनेत राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीत विशेष लक्ष घातले आहे. प्रचाराबरोबर सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. मतदानाच्या दिवसाअखेर हीच परिस्थिती राहिल्यास गुजरातमध्ये  काँग्रेसला यश मिळेल, असा विश्‍वासह शिवराज मोरे यांनी व्यक्त केला.