होमपेज › Satara › दुर्घटनांमुळे असुरक्षित वातावरण; शाळांनी खबरदारी घेण्याची गरज

सहलीच्या विद्यार्थ्यांची पालकांना चिंता

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 11:00PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

डिसेंबर-जानेवारी हा कालावधी शैक्षणिक क्षेत्रात सहलींचा हंगाम मा नला जातो. परंतु, गत वर्षभराच्या कालावधीत अनेक ठिकाणी दुर्घटना व अपघात झाल्याचे ऐकण्यास मिळाले आहे. या सर्व घटनांमुळे सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मात्र आपली मुले घरी येईपर्यंत चैन पडत नाही. सहलीसाठी  विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, सोमवारी किल्‍ले अजिंक्यतार्‍यावर अशाच एका पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांच्या बसला झालेला अपघातही थरकाप उडवून गेला. 

विद्यार्थी व शिक्षकांना सहलीला जाऊन आल्यावर  पुढील अभ्यासासाठी नवी ऊर्जा मिळावी म्हणून सहलींचे पर्यटन स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे इ. ठिकाणी आयोजन केले जाते. 

सर्व शाळांमध्ये सध्या शैक्षणिक सहलींचे नियोजन केले  जात आहे. बर्‍याच शाळांमध्ये सहलीची ठिकाणे  निश्‍चित करुन तारखाही ठरवल्या आहेत. सहलीदरम्यान होणार्‍या दुर्घटना, गैरप्रकार यामुळे विद्यार्थ्यांना सहलीला पाठवताना पालक साशंक असतात. सहलीचा निखळ आनंद घेण्यासाठी शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनी देखील  खबरदारी घेणे आवश्यक आहे.  शैक्षणिक सहलींच्या नियमावलीचे परिपत्रकच शिक्षण विभागाने काढले आहे.

त्यामध्ये सहलीसाठी सरकारी बसेसचाच वापर करावा, जिल्हा किंवा जिल्ह्याबाहेरील सहलींसाठी गट शिक्षणाधिकार्‍यांची, इतर राज्यातील सहलीच्या ठिकाणांसाठी जिल्हा शिक्षण अधिकार्‍यांची परवानगी गरजेची असते. 50 विद्यार्थ्यांबरोबर किमान 3 शिक्षक असणे आवश्यक आहे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. याबाबत सर्व माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच समुद्र, पर्वत, टेकड्या, नदी, तलाव ही ठिकाणे सहलीसाठी टाळावीत. प्रवासादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे पूर्ण लक्ष द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.  

डिसेंबर महिन्याच्या आधी सहलींचे नियोजन करणे गरजेचे असते. मात्र  शासकीय परीक्षा व इतर शैक्षणिक कामकाजामुळे सहलींचा कालावधी जानेवारीपर्यंत वाढत आहे.जिल्ह्यातील शाळांच्या सहलींसाठी सज्जनगड, कराड, कोयनानगर, टोप कोल्हापूर, पन्हाळा, जोतिबा तसेच मुक्कामी सहलींसाठी गणपतीपुळे, डेरवण, मार्लेश्‍वर, कोकण दर्शन अशी ठिकाणे प्राधान्याने निवडली जात आहेत.