Fri, Jun 05, 2020 10:39होमपेज › Satara › राजेंच्या पक्षांतराचा उद्रेक; उदयनराजेंच्या सातार्‍यात पवारांचाच जलवा

राजेंच्या पक्षांतराचा उद्रेक; उदयनराजेंच्या सातार्‍यात पवारांचाच जलवा

Published On: Sep 23 2019 1:58AM | Last Updated: Sep 23 2019 10:16AM
सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले उदयनराजे, आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवेंद्रराजे यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्या ज्या नेत्यांनी पक्षांतर केले त्यांच्या पक्षांतराचा उद्रेक सातार्‍यात रविवारी पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘न भूतो न भविष्यती’ अशी प्रचंड महारॅली तरुणांनी सातार्‍यातून काढली. जल्‍लोष, उत्साह ओसंडून वाहणार्‍या या रॅलीतून पवारांचा जलवा पहायला मिळाला. 

उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे या दोन्ही राजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात घालमेल झाली होती. याशिवाय जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप व शिवसेनेची कास धरली आहे. राजेंच्या पक्षांतरामुळे सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडेल, अशी जी अटकळ बांधली गेली होती तिला रविवारी छेद बसला. 

कर्मवीर जयंतीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार सातार्‍यात आले अन् सारा माहोलच पालटून गेला.  त्यांचा रयत शिक्षण संस्थेतील अभिवादन कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीने महारॅलीचे आयोजन केले होते. त्यासाठी दुपारी दीड वाजल्यापासूनच पोवई नाका व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकांची तोबा गर्दी झाली होती. दुचाकीची महारॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघण्याचे निश्‍चित झाल्यानंतर दुपारी अडीच वाजता खा. शरद पवार, राष्ट्रवादीचे  ज्येष्ठ  नेते  श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील हे पोवई नाक्यावरील शिवतिर्थावर आले. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर हे सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले.

खा. शरद पवार रॅलीमध्ये येताच तरुणाईने अक्षरश: जल्‍लोषाला सुरुवात केली. खा. पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. खा. शरद पवार यांच्यासाठी जिप्सी ठेवण्यात आली होती. कारमधून उतरुन ते जिप्सीमध्ये बसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांना गराडा घातला. तब्बल 15 मिनिटे हा गराडा हालण्याचे नाव घेत नव्हता. 
खा. शरद पवार यांनीही तरुणाईला प्रतिसाद देत त्यांच्यासोबत सेल्फी काढली. त्यामुळे रविवारी सातार्‍यात खा. शरद पवार यांचा एकप्रकारे जलवा पहायला मिळाला. युवकांची सेल्फीची क्रेझ थांबता थांबत नसल्याचे पाहून अखेर पवार यांनी सर्वांना विनंती करीत पुढे चालण्यास सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन रॅलीला सुरुवात झाल्यानंतर ती हळूहळू पुढे कोरेगाव रस्त्यावरील बॉम्बे रेस्टॉरंटपर्यंत आली. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने त्या त्याठिकाणी मुख्य रस्त्यावर काही काळ ट्रॅफिक जॅम झाले. मात्र, रॅली पुढे गेल्यानंतर पोलिस वाहतूक सुरळीत करीत होते. दरम्यान, ऐन उन्हाचा तडाखा असतानाही खा. पवार यांनी ओपन जिप्सीमध्ये अर्धा तास महारॅली काढल्याने सातारा राष्ट्रवादीमय झाला.

शहरातून यापूर्वी अनेक रॅलीज् निघाल्या. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्राही सातार्‍यातून आली. दोन्ही राजेंचा समावेश असलेली महाजनादेश यात्रा व शरद पवारांच्या उपस्थितीत सर्वसामान्य तरुणांनी काढलेली रॅली यात प्रचंड फरक दिसला. सातार्‍याच्या इतिहासातली सर्वांत मोठी रॅली काढून पवारांनी हा जिल्हा आपलाच बालेकिल्‍ला असल्याचे दाखवून दिले. उदयनराजेंच्या सातार्‍यात पवारांच्या विक्रमी महारॅलीची त्यामुळेच जोरदार चर्चा सुरु आहे.