Fri, May 29, 2020 18:01होमपेज › Satara › दहावीच्या निकालाची सूज ओसरली

दहावीच्या निकालाची सूज ओसरली

Published On: Jun 11 2019 1:28AM | Last Updated: Jun 10 2019 9:17PM
सातारा : महेंद्र खंदारे  

दहावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयाचे 20 गुण शाळांच्या हातात होते. शाळांकडून हे गुण मुक्त हस्ते दिले जायचे. मात्र अंतर्गत गुणांची पद्धत यंदा बंद झाली. ही बाब निकालाची सूज उतरण्यास प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सातारा जिल्ह्याचा निकाल तब्बल 7.20 टक्क्यांनी घसरला आहे. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. पास विद्यार्थी संख्याही घटली असून नापास विद्यार्थी संख्या वाढली आहे. शंभर टक्के निकालाच्या शाळांची संख्याही 201 वरून 83 पर्यंत खाली आली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2019 मध्ये घेतलेल्या दहावी  परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. सातारा जिल्ह्याचा निकाल 86.23 टक्के लागला आहे. गेल्यावर्षीचा निकाल 93.43 टक्के होता. निकाल 7.20 टक्क्यांनी घटला आहे. मार्च 2018 च्या तुलनेत मार्च 2019 च्या परीक्षेला 441 विद्यार्थी कमी बसले होते. मात्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 3 हजार 481 ने घटली आहे. नापास विद्यार्थी संख्या 3 हजार 39 ने वाढली आहे. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी संख्या 2 हजार 916 ने कमी झाली आहे. 

प्रथमश्रेणी आणि द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थींच्या संख्याही कमी झाली आहे. केवळ उत्तीर्ण श्रेणीतील विद्यार्थी संख्या वाढली आहे. हे सर्व आकडे निकालाची सूज उतरल्याचेच स्पष्ट करत आहेत. दहावी परीक्षेतील अंतर्गत गुण हा विषय नेहमीच चर्चेचा राहिला. मराठी, संस्कृत/हिंदी, इंग्लिश या विषयांच्या तोंडी परीक्षेला प्रत्येकी 20 गुण होते. सामाजिक शास्त्रे या विषयालाही अंतर्गत परीक्षेतील गुण आणि गृहपाठाचे गुण या आधारे 20 गुण दिले जायचे. विज्ञान आणि गणित विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेला प्रत्येकी 20 गुण होते.  प्रत्येक विषयाची लेखी परीक्षा 80 गुणांची आणि अंतर्गत गुण 20 होते. अंतर्गत गुण मुक्त हस्ते दिले जायचे. खरेतर विद्यार्थ्यांची सर्वांगिण गुणवत्ता तपासण्यासाठी हे अंतर्गत गुण होते. पण मूळ हेतू बाजूला पडला आणि अंतर्गत गुण पैकीच्या पैकी दिले जाऊ लागले. त्यामुळे गुण आणि निकाल वाढत होता. अंतर्गत गुणांची पद्धत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून बंद झाली. त्यानंतरच्या परीक्षेचा हा पहिलाच निकाल होता. केवळ गणित आणि विज्ञान या दोनच विषयांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 20 गुण होते. 

उर्वरीत चार विषयांची लेखीपरीक्षा 100 गुणांची होती. यावेळी दहावीचा अभ्यासक्रम बदलला. कृतिपत्रिकेवर भर देण्यात आला. पाठांतरापेक्षा विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती, स्वमत जोखण्यात आले. पहिली ते दहावीपर्यंत जे व्याकरण शिकलो ते दहावीपर्यंत किती लक्षात ठेवले यालाही काही गुण ठेवण्यात आले. हे सर्व बदल झाले असले तरी निकालाची सूज उतरण्यास बंद झालेले अंतर्गत गुण हेच प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे दिसत आहे.
  
                                            2018                                       2019       
दहावी निकाल                       93.43 टक्के                           86.23 टक्के       
परिक्षा दिलेले विद्यार्थी          43 हजार 71                           42 हजार 630       
उत्तीर्ण विद्यार्थी                 40 हजार 241 विद्यार्थी             36 हजार 761        
नापास विद्यार्थी                  2 हजार 830विद्यार्थी               5 हजार 869       
विशेष प्राविण्य                     12 हजार 534                       9 हजार 618       
प्रथम श्रेणीत                       14 हजार 238                       12 हजार 747       
द्वितीय श्रेणीत                  10 हजार 801                         11 हजार 208       
उत्तीर्ण                              2 हजार 668                           3 हजार 186