Tue, Apr 23, 2019 01:54होमपेज › Satara › उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक जीवघेणी 

उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक जीवघेणी 

Published On: Jan 19 2018 2:00AM | Last Updated: Jan 18 2018 9:10PMसातारा : प्रतिनिधी

ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून ही वाहतूक अक्षरश: जीवघेणी बनली आहे. बेदरकार ड्रायव्हिंग व मद्यपी चालक अशा दुर्घटनांना कारणीभूत ठरत असून  भल्या मोठ्या आवाजात ट्रॅक्टरवर लावली जाणारी टेपरेकॉर्डवरील गाणीही अनेकदा अपघात घडवून आणत असल्याचे वास्तव आहे. रिप्लेक्टरअभावीही अनेकांचे हकनाक जीव जात आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीबाबत जनमाणसात संतापाचे वातावरण असून त्याचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत. 

विडणी (फलटण) व चंचळी (कोरेगाव) येथील काल-परवाच्या  ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातांनी  निष्पापांचा बळी गेला. त्यामुळे या ट्रॅक्टर ट्रॉलींच्या वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. रिप्लेक्टर बसवण्यासाठी आरटीओ, पोलिस यंत्रणा व सामाजिक संस्थांच्यावतीने नेहमीच पुढाकर घेतला जातो. मात्र, तरीही अनेक   ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉली रिफ्लेक्टर न बसवताच रस्त्यावरून बेफामपणे धावत असतात.

अनेकदा या ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावरच उभ्या असतात. रात्रीच्यावेळी अन्य वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यातून अपघात घडत असतात. त्यामध्ये अनेकांचे हकनाक जीव जातात. याशिवाय ऊस वाहतूक करणार्‍या अन्य ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे अनेकदा भीषण दुर्घटना घडल्या आहेत. अशा वाहनांचे काही चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याच्या तक्रारीही आहेत. बुधवारी चंचळी येथील घडलेली एक दुर्घटना सुन्‍न करून गेली. या अपघातात शेतातून परतणार्‍या वडील व मुलावर काळच धाव आला. महाविद्यालयीन मुलाचा बळी गेला तर पिता मृत्यूशी झुंज देत आहे. अशा घटना वाढत आहेत. ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलींना कडक नियमावली लागू करण्याची गरज आहे. 

मोठ्या आवाजातील ट्रॅक्टरवरील गाणी धोकादायक

ऊस वाहतूक करणार्‍या अनेक ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजातील टेपरेकॉर्डर सुरू असतो. ट्रॅक्टरच्या धडधडीमुळे चालक भल्या मोठ्या आवाजात गाणी लावून बेदरकार ड्रायव्हिंग करत असतो. त्यामुळे अनेकदा अशा चालकांना लगतची  वाहने व पादचार्‍यांचे काहीही घेणे-देणे नसल्याचे आढळून येते. मोठ्या आवाजामुळे अशा वाहनांचा आवाजच या चालकांना येत नसून त्यातून अनेक भीषण दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा चालकावर पोलिसांनी जरब बसवावी. अशा चालकांना अद्दल घडवण्याची तंबी चंचळी, ता. कोरेगाव येथील ग्रामस्थांनी दिली आहे.