Wed, Apr 24, 2019 08:06होमपेज › Satara › विरोधकांनी एकत्र यावे : महसूलमंत्र्यांचे आवाहन

विरोधकांनी एकत्र यावे : महसूलमंत्र्यांचे आवाहन

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 19 2018 1:12AMकराड : प्रतिनिधी 

भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक एकत्र येऊ लागल्याचे सांगत सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’वर ना. चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. विरोधकांना एकत्र येण्याचे खुले आव्हान देत उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव चिंताजनक नसल्याचेही ना. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील नवनिर्वाचित भाजप ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ना. पाटील म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी दिल्लीत सोनिया गांधींच्या उपस्थितीत नुकतीच ‘डिनर डिप्लोमसी’ झाली. राज्यातही अनेकांना आशा निर्माण झाली आहे. हे सर्व उत्तरप्रदेशमधील एका पराभवामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये पराभवाबाबत भाष्य करताना ना. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या लोकसभा मतदारसंघातील पराभवाचे विश्‍लेषण तर करा?’ असे आवाहन विरोधकांना केले.

तेथे मायावती, मुलायमसिंह यादव यांचे चिरंजीव यांचे दोन बलाढ्य पक्ष तब्बल 23 वर्षांनी एकत्र आले. मुख्यमंत्री 25 वर्ष त्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे थोडे गाफील राहिले असतील. मात्र, केवळ 37 टक्केच मतदान होऊनही 21 हजारांनी भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. दोन - चार टक्के अधिक मतदान झाले असते, तर दोन्ही बलाढ्य पक्ष एकत्र येऊनही आम्ही त्यांचा पराभव केला असता, असा विश्‍वास व्यक्त करत उत्तरप्रेदशमधील पराभव चिंताजनक नसल्याचे सांगितले.

तसेच भाजपचे सरकार 2019 मध्ये आले तर काय होईल ? ते परत मागे फिरणार नाहीत. या भीतीने देशासह राज्यात विरोधक एकत्र येत आहेत. मात्र, आम्ही विरोधक एकत्र येण्याचीच वाट पहात आहोत. ते एकत्र आल्यास आम्ही अधिक जिद्दीने उभे राहू, असे सांगत देशातील व राज्यातील विरोधी पक्षांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खुले आव्हान दिले आहे.