Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Satara › लोकशाहीचा चौथा स्तंभ जपण्याची गरज

लोकशाहीचा चौथा स्तंभ जपण्याची गरज

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 9:09PM

बुकमार्क करा
खंडाळा : वार्ताहर

प्रत्येक घटनेची वास्तव माहिती समाजापर्यंत पोहचवण्याचे काम पत्रकार करतो. देशाचे कौशल्य, सामर्थ्य व तरुण पिढीला दिशा देण्याचे काम आज फक्‍त पत्रकारिता करत आहे. त्यामुळे लोकशाहीचा हा चौथा स्तंभ जपण्याची गरज असून त्यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन बांधून द्यावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, सातारा-सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख व शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे - पाटील यांनी खंडाळ्यात केले.

खंडाळा पंचायत समितीच्या किसनवीर स्मारक सभागृहात खंडाळा तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिन आणि आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे होते. यावेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, शंकरराव गाढवे, पुरुषोत्तम जाधव, कृषी सभापती मनोज पवार, जि. प. सदस्य उदय कबुले, डॉ. नितीन सावंत, दिपालीताई साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले, वृत्तपत्रे ही समाजमनाचा आरसा दाखवणारी आहेत. जगातील सर्व क्रांत्या या साहित्यिक व पत्रकारांच्या लेखणीमुळेच घडल्या. लढाया या शस्त्राने जिंकता येत नाहीत. शस्त्रापेक्षा शास्त्राने, लेखणीमुळे लढाया जिंकता येतात. पत्रकारांनी समाजातील विध्वंसक घटनांपेक्षा विकासात्मक चांगल्या घटनांना प्रसिद्धी द्यावी. गुन्ह्यांच्या बातमीपेक्षा शिक्षेची बातमी मोठी दिल्यास गुन्हेगारीला आळा बसेल. नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. सोशल मिडियाला विश्‍वासार्हता नाही. मात्र, वृत्तपत्रांची विश्‍वासार्हता टिकवण्याचे काम पत्रकारांनी करावे. सर्व गुणसंपन्न व्यक्तीमत्व असणार्‍या शिवाजीराव जगताप यांना गौरवले, तसेच भविष्यात पत्रकार संघाने युवा पत्रकारांना पुरस्कार देवून प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे म्हणाले, खंडाळ्याची माती महान असून माणसांच ह्रदय मोठे आहे. त्यांनी नेहमीच वाईला झुकतं माप दिले. वाईकरांनीही खंडाळ्याच्या माणसांचा सन्मान करावा. खंडाळ्यात समृद्धी आली असली तरी परिस्थिती बदलली नाही. एमआयडीसी आहे पण तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम नाही.  कालवे खंडाळ्याच्या जमिनीतून गेले पण इथलं शिवार भिजत नाही. या बाबींकडे खंडाळ्यातील पत्रकारांनी दुर्लक्ष करता कामा नये. पत्रकाराची भूमिका ही नेहमीच आंदोलकाची असली पाहिजे. खंडाळ्यातील पत्रकार भवनाबाबत आजपर्यंत आश्‍वासने झाली. एक वर्षाच्या आत खंडाळ्यात पत्रकार भवन उभे राहिले नाही तर खंडाळ्यातील जनतेला बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल. भविष्यात राजकीय लोकप्रतिनिधींना सहकार्य करायचे की नाही,याबाबतची भूमिका पत्रकारांनाही घ्यावी लागेल.

यावेळी शिवाजीराव जगताप, डॉ. नितिन सावंत, पं. स. सदस्य चंद्रकांत यादव, पुरुषोत्तम जाधव, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मनोज पवार यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजीराव जगताप यांना आदर्श पत्रकार म्हणून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शंकरराव जाधव, अशोक गारोळे यांचाही सन्मान करण्यात आला.

प्रारंभी ‘दपर्ण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच जि. प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. यावेळी खंडाळा व वाई तालुक्यातील पत्रकार, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. प्रास्तविक रमेश धायगुडे यांनी केले. सूत्रसंचलन शशिकांत जाधव, दशरथ ननावरे यांनी केले. संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण यादव यांनी आभार मानले.

कार्यक्रमास स्वारिपचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित यादव, माजी उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदना धायगुडे, राजेंद्र तांबे, अश्‍विनी पवार, शोभा जाधव, चंद्रकांत यादव, शिवसेना तालुका प्रमुख आदेश जमदाडे, अंकुश पवार, राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ, माजी सभापती एस. वाय. पवार, प्रकाश देशमुख, गजेंद्र मुसळे, गुरुदेव बरदाडे, अनुप सूर्यवंशी, ए. एस. गायकवाड, दत्ता मर्ढेकर, भद्रेश भाटे, विश्‍वास पवार, तहसिलदार विवेक जाधव, गटविकास अधिकारी दिपा बापट, आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. मकरंद पाटील यांच्याकडून जागेची पाहणी करण्याचे आदेश

पत्रकार भवनाचा विषय पत्रकार गौरव सोहळ्याच्या अजेंड्यावर आल्यानंतर लगेचच आ. मकरंद पाटील यांनी खंडाळ्याच्या शासकीय विश्रामगृहावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्यासह खंडाळा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. तेथूनच त्यांनी अधिकार्‍यांना जागा पाहण्याचे आदेश दिले. दुसर्‍या दिवशी पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन हे काम प्रायॉरेटी बेसवर हातात घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आज मी जो आहे तो पत्रकारितेमुळे : प्रा. बानुगडे-पाटील

नेतृत्व उभे करायचे की पाडायचे, कर्तृत्व जगासमोर आणायचे की नाही, हे पत्रकार ठरवत असतात. माझ्या उमेदीच्या काळात मीही ‘पुढारी’मध्ये काहीकाळ ग्रामीण भागात पत्रकारिता केली. त्यावेळेस हरीष पाटणे यांची मला खूप साथ मिळाली. आज माझे जे काही नाव झाले आहे त्याची सुरुवात त्यांनीच करुन दिली, हे मी नम्रपणे कबुल करतो, असे प्रा. बानुगडे-पाटील आपल्या भाषणात म्हणाले.

पत्रकार भवनासाठी एक लाखाची देणगी 

खंडाळ्यात पत्रकार भवन उभारणीसाठी आ. अजित पवार यांनी गतवर्षी पाच लाखांचा निधी जाहीर केला आहे. कामाला चालना मिळावी म्हणून भाजपाचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनीही दि. 6 जानेवारीला भवनासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.