Thu, Jun 27, 2019 17:47होमपेज › Satara › ग्रामीण भागात साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज

ग्रामीण भागात साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज

Published On: Mar 06 2018 7:54PM | Last Updated: Mar 06 2018 7:29PMवाखरी : स . रा . मोहिते 

दिवसेंदिवस ग्रामीण व शहरी भागात लहान-मोठ्या स्वरूपाचे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. तथापि, गुन्हा घडून गेल्यानंतर खूप उशिरा पोलिस यंत्रणेला याचा सुगावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण  भागात साध्या वेशातील पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज असून गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा याबाबत विचार करणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. 

सध्या शहराबरोबरच ग्रामीण भागातही चोर्‍या-घरफोड्या, मारामार्‍या यासह दंगली होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. जातीय दंगलीमुळे तर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. अनेक ठिकाणी दरोडे, बँका लुटणे, एटीएम फोडणे, गाडया पळवणे असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. शालेय मुलींची छेडछाड काढणे, मुलींना फूस लावून पळवणे स्त्रियांवरील अत्याचार अशा घटनांमुळे समाजनमनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यातच पोलिसांच्या कडून तपासात अत्यंत दिंरगाई होत आहे. अनेक घटनांचा काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. अशा प्रकरणांचे पुढे काय होते हा संशोधनाचा विषय आहे. मुळातच पोलिस मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत असतात. तथापि, पुरेसे मनुष्यबळ, खबर्‍यांचे स्त्रोत विश्‍वसनीय असणे गरजेचे आहे. याचीच वानवा असल्याने गुन्हा घडल्यानंतर पोलिस यंत्रणा जागी होते.

यानंतर गुन्हेगार  शोधण्यासाठी खूप काळ द्यावा लागतो. विलंबामुळे गुन्हेगार पलायन करतो, पुरावे नष्ट करतो. त्यामुळेच  ग्रामीण भागामध्ये 
पुरेशा प्रमाणात साध्या वेषातील पोलिस कार्यरत करणे काळाची गरज बनली आहे. यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होऊ शकते. 
तसेच गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळता येतील.