Tue, Jun 25, 2019 13:09होमपेज › Satara › जाती-धर्मातील द्वेष संपवण्याची गरज

जाती-धर्मातील द्वेष संपवण्याची गरज

Published On: Jun 07 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 11:55PMसातारा : प्रतिनिधी  

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सहभागी करून स्वराज्याची स्थापना केली होती. मात्र, आत्ताची परिस्थिती बदलली असून समाजामध्ये जाती आणि धर्मातील द्वेष वाढत चालले आहेत. हा व्देष संपविण्याची गरज असून त्यासाठी शिवभक्तांनी जाती, धर्म आणि पंथ मानणार नाही, अशी आजच्या शिवराज्याभिषेक दिनी शपथ घ्यावी असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
शिवतीर्थावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी दै.‘पुढारी’चे वृत्त संपादक  हरिष पाटणे, नगरसेवक अमोल मोहिते, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गणेश चोरगे, नाना इंदलकर, शहराध्यक्ष रोहित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, शिवाजी महाराजांकडे बंधुत्व ही भावना असल्यामुळे त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास सर्व जातीचे लोक आपला राजा म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. शिवाजी महाराजांचे एकच स्वप्न होते की, सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य स्थापन करायचे. त्याप्रमाणे त्यांनी मोगलाई विरुद्ध लढा द्यायचे ठरवून त्यांनी ते करून दाखवले. त्यामुळेच देशात आजचा दिवस राज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जात असल्याने सर्व जण सहभागी होतात. 

समाजातील लोक शिवाजी महाराजांवर प्रेम करताना त्यांना दैवत मानतात. त्यामुळे आजच्या राज्याभिषेक दिनी एक शपथ घेऊया आजपासून जाती- धर्म मानणार नाही, गुण्या गोविंदाने एकत्र राहू आणि महाराष्ट्राचे चित्र सामाजिक चित्र होईल असे राहू द्या, असे आवाहन केले. संभाजी ब्रिगेड गेल्या 8 वर्षांपासून हा सोहळा साजरा करत आहेत. तो कसा मोठा करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, महाराष्ट्रभरात सर्वत्र आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा फक्त आजच्या एका दिवसासाठी न साजरा होता जिल्ह्यातील असणारे 22 किल्ले राज्य संरक्षित स्मारक करून ते विकसित करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी सांगितले. यावेळी  रश्मी साळवी, श्रावणी सोळस्कर, तात्यासाहेब डेरे, रवींद्र पाटील, महेश कांबळे, सागर चोरगे, आशिष गाडे,गौरव डोंगरे, गणेश जाधव, दीपराज हादगे, सागर भोसले, अविनाश पवार, अनिकेत नवघणे, स्वप्निल नलवडे, मंगेश शिंदे, रोहन गाडेकर, स्वप्निल ओवे, प्रथमेश कदम, वैभव निकम संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.