Fri, Jun 05, 2020 10:50होमपेज › Satara › युवकांच्या मौजमस्तीवर अंकुश ठेवण्याची गरज

युवकांच्या मौजमस्तीवर अंकुश ठेवण्याची गरज

Published On: Dec 13 2018 1:43AM | Last Updated: Dec 12 2018 10:23PM
सातारा : विशाल गुजर 

आजच्या आधुनिक युगात तरूणाई स्मार्ट झाली आहे. पिकनिक,  पिक्‍चर, वाढदिवस, जेवणावळ यासह विविध कारणांसाठी युवक कॉलेजलाही दांड्या मारतात. मात्र, याचवेळी वेगळे असे काही घडत असल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. सध्याचे अनेक युवक हे व्यसनाच्या आहारी गेले आहे. त्यातून मस्ती करताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. विद्यार्थ्यांच्या या मौज मजेमुळे घरच्यांना मात्र घोर लागून राहत आहे. त्यामुळे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आता व्यक्‍त होऊ लागली आहे.

बरेचसे विद्यार्थी पालकांना अंधारात ठेऊन कॉलेजला मौजमस्ती करण्यासाठी जातात. कॉलेजचा प्रत्येक क्षण एन्जॉय कसा करता येईल याकडे विद्यार्थी आपले लक्ष अधिक केंद्रीत करतात. मित्र—मैत्रिणीचा वाढदिवस, वार्षिक स्नेहसंमेलन, सहल, सण  या गोष्टी  सेलिब्रेशन करताना विद्यार्थ्यांना कशाचीच अट राहत नाही. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकाराची पालकांना मात्र पुसटशीही कल्पना नसते.दिवसभर ते मोबाईलवर डोकं घालून बसतातच. त्याचबरोबर फिरायला गेल्यावर जीव घेणी कसरत करत तरुणाई सेल्फीच्या मोहात पडत असतात. कुठे कठड्यावर तर कुठे धबधब्याच्या काठावर तर कुठे रेल्वे ट्रॅकवर कधी जातील आणि कसा सेल्फी घेतील याचा नेम नाही.

या सेल्फीच्या नादात आजअखेर अनेकांचा जीवही गेला आहे. दोन दिवसांपूर्वी कास पठारावरील एका हॉटेलमध्ये वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी महाविद्यालयीन एक प्रेमीयुगल जोडपे गेले होते. त्यांनी एक रूम बुक केली होती. यावेळी सेलिब्रेशन करून झाल्यानंतर काही गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला आणि केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूनेे या युवकाने आपल्या हाताची नस कापून घेतली. यावर त्या युवतीने आरडा-ओरडा केल्याने हॉटेलमधील कर्मचार्‍यांनी धाव घेत संबंधित युवकाला तात्काळ सातार्‍यातील खासगी रुग्णालयात दाखल केले.  खरं तर आपली मुले महाविद्यालयात  शिकत आहेत, या संभ्रमात मुलांनी पालकांना पुढे काय वाढून ठेवले याची साधी कल्पना नसते.  विद्याथ्यार्ंनी आपले आई—वडील करत असलेल्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे.  मौजमस्तीत स्वत:बरोबर पालकांचेही नुकसान करत असल्याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी कॉलेज प्रशासनानेही याबाबत लक्ष दिले पाहिजे तरच अशा गंभीर प्रकारांना आळा बसेल.

सेलिब्रेशनसाठी डोंगर कपारीची निवड

कॉलेजच्या नावाखाली कॉलज युवक—युवती फिरायला जाण्यावर अधिक भर देतात. विशेष म्हणजे सेलिब्रेशनची निवडलेली जागा नामी  असते. विद्यार्थ्यांचे सेलिब्रेशनचे स्पॉट म्हणजे डोंगर कपारी,नदीनाले किंवा धरणाची, जंगलाची ठिकाणे. खरं ही ठिकाणे तशी धोकादायकच. अनेक हुल्‍लडबाज या ठिकाणी येऊन धिंगाना घालत असतात. तरी देखील  कॉलेज युवक—युवती अशाच ठिकाणी मौजमस्ती करण्यासाठी जात असल्याचे पहायला मिळत आहे. याबरोबरच सातारा परिसरातील कास, यवतेश्‍वर, ठोसेघर, उरमोडी, कण्हेर, चारभिंत, अजिंक्यतारा यासह शहरातील आडोशाला असणार्‍या जागेत अश्शील चाळे करत असतात.