Sun, Jul 21, 2019 12:16होमपेज › Satara › मातीतील कुस्ती टिकवणे काळाची गरज : हिंदकेसरी दिनानाथसिंह

मातीतील कुस्ती टिकवणे काळाची गरज : हिंदकेसरी दिनानाथसिंह

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 8:24PMकोपर्डे हवेली : वार्ताहर

महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा म्हणून नावाजलेली मातीतील कुस्ती टिकवणे ही काळाची गरज आहे, असे मत हिंदकेसरी दीनानाथसिंह यांनी व्यक्त केले. 

सैदापूर येथे नव्याने साकारलेल्या कॅप्टन खाशाबा दाजी शिंदे व महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील कुस्ती संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, सम्राट महावीर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, कॅप्टन खाशाबा शिंदे, उद्योजक धनाजी शिंदे, पंचायत समिती सदस्या शुभांगी पाटील, कराड  तालुका कुस्ती संघटनेचे कार्याध्यक्ष धनाजी पाटील, हिंदकेसरी पै. संतोष वेताळ यांची प्रमुख उपस्थिति होती. 

हिंदकेसरी दिनानाथसिंह म्हणाले, स्व. खाशाबा जाधव यांच्या कर्मभूमीत साकारलेले हे कुस्ती संकुल नामवंत मल्ल तयार करेल. ग्रामीण भागात सध्यस्थितीत कुस्ती या खेळाला चांगले दिवस आले आहेत. तरूणांच्या बरोबरीने आता महिलाही या खेळात सहभागी होत आहेत. शासनाने कुस्ती या खेळास प्रोत्साहन दिल्यास लाल मातीतील कुस्ती सातासमुद्रापार जाईल. शासनाने या खेळात विशेष प्राविण्य मिळवणार्‍या पैलवानांना मानधन सुरू करावे.

आरोग्य सेवा कार्ड, मोफत बस सेवा व राहण्यास शासकीय जागा या सुविधा मिळवून द्याव्यात. शासनाने या सर्व सुविधा मिळवून दिल्यास नामवंत मल्लांची संख्या वाढेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. आ. बाळासाहेब पाटील यांनी विद्येच्या माहेरघरात कुस्ती संकुलाच्या उभारणीमुळे विद्यानगरीच्या शिरपेचात आणखी एक मुकुटमणी खोवल्याबद्दल पै. संतोष वेताळ यांचे कौतुक केले. तर आ. आनंदराव पाटील यांनीही या तालमीचा गौरव महाराष्ट्रभर व्हावा, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला कराड पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कुस्ती संकुलास केली 10 गुंठे जमीन दान....

या ठिकाणी कुस्ती संकुलाच्या उभारणीसाठी कँप्टन खाशाबा शिंदे व उद्योजक धनाजी शिंदे यांनी 10 गुठे जमीन दान दिली. ज्या परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. तेथेच जमीन दान करणारे असे दानशूर मिळणे, हा दैवी संकेत आहे. या दातृत्वासाठी धनाजी शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

 

Tags : satara, satara news, Dinanath Singh, wrestling,